DNA मराठी

राजकीय

new mathematical clues in maharashtra politics

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नवे गणिताचे संकेत

maharashtra politics – मुंबई – dna मराठी टिम – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातले समीकरण दिवसागणिक बदलत आहेत. एकीकडे महायुतीचे सरकार आहे. यात भाजपा, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिघांचा सत्तेत समावेश आहे. परंतु या तिघांचे नाते अजून स्थिर झालेले दिसत नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना असून विरोधक म्हणून ते एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्था आणि महानगर पालिका. यात सर्वधिक महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महानगर पलिक या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. “जनतेच्या मनात काय आहे तेच आम्ही करणार” या ठाकरे बंधूंच्या विधानांनी चर्चेला अधिकच उधाण आले आहे. मराठी अभिमान, महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न, तसेच ‘मराठी माणूस’ या मुद्द्यावर या दोन्ही ठाकरे एकत्र आले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठे समीकरण ठरू शकते. दोन्ही ठाकरेंचे एकत्र येणे ही घटना केवळ विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधाऱ्यांसाठीही चिंतेची बाब ठरेल. दरम्यान, महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही, हे अलीकडच्या घडामोडींवरून स्पष्ट दिसते. नाशिक येथील मेळाव्यात लागलेली काही पोस्टर आणि त्यातून उमटलेला संदेश, शिंदे गटातील अस्वस्थता, तसेच अजित पवार गट व भाजपामधील अदृश्य तणाव या गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या खरी ओळख ठरवण्यासाठीचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या निकालावर महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय समीकरणांचा मोठा भाग अवलंबून आहे. जर न्यायालयाचा निकाल शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर सध्याच्या सत्तासमीकरणाला मोठा धक्का बसेल. एकनाथ शिंदे यांची पुढची भूमिका काय असेल – ते भाजपात विलीन होतील की स्वतंत्र ओळख राखण्याचा प्रयत्न करतील, हा महत्त्वाचा प्रश्न ठरेल. तसेच अजित पवारांचा गट जर शरद पवारांकडे परत गेला, तर शरद पवार सत्तेत जाण्यास तयार होतील का, की ते पुन्हा आघाडीच्या राजकारणाला नवा आकार देतील, हे पाहणे रंजक ठरेल. याशिवाय अलीकडेच शिंदे गटातील काही नेत्यांवर ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. अशा चौकशा आणि दबावामुळे अंतर्गत नाराजी अधिक टोकदार होऊ शकते. एकंदरीत, महाराष्ट्राचे राजकारण सध्या अनिश्चिततेच्या टप्प्यात आहे. ठाकरेंची युती, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, शिंदे यांचा निर्णय आणि भाजपाची धोरणे — या सर्व घटकांचा भविष्यातील समीकरणांवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा नवे गणित उभे राहू शकते.

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नवे गणिताचे संकेत Read More »

controversial decision of ncp ajit pawar group to give suraj chavan a chance as state general secretary

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय

Ajit Pawar – Sunil Tatkare – Suraj Chavan मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) NCP मध्ये अलीकडेच युवक प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेल्या सूरज चव्हाण ( Suraj Chavan) यांना पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. अल्पावधीतच त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूरज चव्हाण यांना काही दिवसांपूर्वीच पक्षशिस्तभंगाच्या कारणास्तव पदावरून दूर करण्यात आले होते. परंतु, अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वातील निर्णयप्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात निष्ठा आणि संघटन कौशल्य याला महत्त्व देण्यात येते, असे सांगत समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, विरोधकांनी या संधीला “निलंबनाचे नाटक” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युवकांमध्ये चव्हाण यांचा ठसा उमटलेला असला तरी त्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. “एका बाजूला शिस्तभंगाच्या नावाखाली शिक्षा आणि दुसऱ्याच बाजूला बढती, हा दुहेरी मापदंड” असा सूर व्यक्त होत आहे. काही कार्यकर्त्यांनीही आतल्या गोटात नाराजी दाखवली असल्याची माहिती मिळते. दरम्यान, अजित पवारांनी मात्र या नेमणुकीला संघटन मजबुतीसाठी आवश्यक पाऊल असे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे. महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात सूरज चव्हाण यांना अधिक सक्रीय भूमिका मिळणार असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत. नेमकं काय घडलं होतं? तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, त्या नंतर लातूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावर लातूरमध्ये होते. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकार परिषदेत पत्ते फेकत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तटकरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले, परंतु यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या घटनेनंतर सामाजिक व राजकीय स्तरावर तीव्र टीका झाली. परिणामी, अजित पवारांनी चव्हाण यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, काही महिन्यांतच सुरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. निलंबनानंतर मिळालेली ही बढती नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर झाली, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात अजित पवार गटाचा हा निर्णय पक्षासाठी फायदेशीर ठरेल की नवे वाद निर्माण करेल, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय Read More »

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता

Ram Shinde : जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. २१.१३ लाख खर्च मंजूर असून, तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केला जाणार आहे. यामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होईल व पाणी साठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळेल. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर) येथे सुमारे रु. १२०९ कोटींचा बृहद विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात चौंडी परिसरातील ऐतिहासिक व पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे. ६ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत “श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यास” मंजुरी देण्यात आली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा शासन दरबारी मंजूर झाला. यामध्ये सिना नदी सुशोभीकरण, नदीपात्र स्वच्छता, शुद्धीकरण व दोन बुडीत बंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. विकास आराखड्याचा निधी तपशील :- चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन – रु. ६८१ कोटी ३२ लाख चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे – रु. ३६० कोटी सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे – रु. ५० कोटी एकूण – रु. १०९१ कोटी ३२ लाख या निर्णयाचे स्थानिक नागरिक, विविध समाजघटक व सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेशी अशी चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी होईल व सिना नदीवरील बुडीत बंधारे प्रकल्पामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता Read More »

manoj jarange

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

prakash ambedkar

Prakash Ambedkar यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र पण…

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 10 ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पत्राच्या 4 दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अ‍ॅड. आंबेडकर यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते.  परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी सांगितले की, यापूर्वी 16 जानेवारी 2025 रोजी त्यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खरगे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, जर राहुल गांधी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे “गुप्त” आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असे त्यांनी सुचवले आहे. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, “आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे.” अ‍ॅड. आंबेडकरांच्या या पत्रानंतर, कॉंग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Prakash Ambedkar यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र पण… Read More »

job

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत

Maharashtra Police: नोकरीच्या पदावर कायम राहताना, महाविद्यालयात जाऊन पूर्णवेळ (फुलटाईम) शिक्षण घेतल्याचे खोटे दाखले सादर करून पदोन्नती व वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने चांगलीच नजर रोखली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरलं झाला असून कर्मचाऱ्यांना थेट इशारा देणारा ठरला आहे. व्हायरल झालेला वाहतूक विभागाच्या परिपत्रका नुसार , चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध पदांवरील काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता मिळवताना नियम धाब्यावर बसवले. नियमानुसार, पूर्णवेळ शिक्षण घेण्यासाठी नोकरीवरून सुटी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी नोकरी करतानाच फुलटाईम पदवी घेतल्याचे दाखवून लाभ मिळवला. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, नियुक्ती प्रक्रियेनंतर घेतलेली पदवी नियमबाह्य पद्धतीने मिळवलेली असल्यास ती वैध मानली जाणार नाही. तसेच अशा शिक्षणावर आधारित पदोन्नती, वेतनवाढ किंवा अन्य लाभ तत्काळ रद्द केले जातील. अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आले आहे की, संशयास्पद प्रमाणपत्रांसह पदोन्नतीसाठी अर्ज आले तर त्यांची काटेकोर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. यामुळे बनावट शैक्षणिक दाखल्यांच्या बळावर गोडीगुलाबीने पदोन्नती मिळवणाऱ्यांचे दिवस आता मोजकेच उरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या हालचालीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, ‘कोणाच्या गळ्यात कारवाईची घंटा वाजणार?’ हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेत आहे.

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत Read More »

harshvardhan sapkal dna

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, वन नेशन वन लिडर संकल्पना आणून एकच नेता, एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता 15 ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे. कबुतरांसाठी लोढा-अदानींनी विशेष टॉवर बांधावे कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांचे पंख व विष्टेपासून फुप्फुसाचे गंभीर आजार होतात यात काहीजणांना जीवही गमवावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे, पण भाजपा सरकारने जाणीव पूर्वक कबुतर जिहाद सुरु केला आहे. सरकारने अदानीला अर्धी मुंबई देऊन टाकली आहे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले. भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही. NSUI च्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनात पार पडला. मावळते अध्यक्ष आमीर शेख यांनी अध्यक्षपदाची सुत्रे साळुंके यांच्या हाती दिली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी, माजी अध्यक्ष अमीर शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाच्या लेनी जाधव वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

ration

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ

Maharashtra Politics : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना 53 हजार 910 रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र सरकारकडून 45 रुपये आणि राज्य सरकारकडून 105 रुपये असे एकूण क्विंटलमागे 150 रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे 20 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये (1700 रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92 कोटी 71 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ Read More »

maharashtra police requirement

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर

Maharashtra Police Requirment : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर Read More »