DNA मराठी

ताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर राहुरीत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरी

Maharashtra Government: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास तसेच राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयल स्थापन करण्यास व त्यासाठीच्या आवश्यक पदांना मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्च यासाठी सुमारे 485 कोटी 8 लाख रुपयांच्या अपेक्षित खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार या महाविद्यालयाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा पुढील सात वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच महाविद्यालय व रुग्णालयाकरिता आवश्यक व सुयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर या जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थलांतरीत करण्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयल स्थापन करण्यास व त्यासाठीच्या आवश्यक पदांना देखील मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. सध्या, राहुरी येथे 4 दिवाणी न्यायालये कनिष्ठ स्तर कार्यरत आहेत. त्यापुढील स्तरावरील येथील प्रकरणे अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथे चालविली जातात. या न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणाची संख्या अनुक्रमे 9 हजार 235 व 21 हजार 842 इतकी आहेत. राहुरी ते अहिल्यानगर न्यायालयामधील अंतर 45 किलोमीटर इतके आहे. राहुरी तालुक्याची सीमा संगमनेर तालुक्यापर्यंत लांब आहे. त्यामुळे पक्षकारांना दूर अंतरावर जावे लागते. या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित प्रकरणे, अहिल्यानगर न्यायालयापासूनचे अंतर, न्यायदान कक्षाची उपलब्धता या बाबींचा विचार करून, उच्च न्यायालयाच्या “न्यायालय स्थापना समितीने” राहुरी जि. अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायीक अधिकाऱ्याचे 1 पद, कर्मचाऱ्यांची 20 पदे व चार मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मंत्रिपरिषदेने मंजुरी दिली.

अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर राहुरीत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरी Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. सूतगिरणीमुळे परिसरात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी 91 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा 2.700 किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने 3 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने 5.50 मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन Read More »

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार, पोलिसांकडून शोध सुरू

Ajaz Khan : सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता एजाज खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. माहितीनुसार मुंबईत एजाज खानविरोधात एका माहिलने बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, एका 30 वर्षीय महिलेने एजाज खानविरुद्ध मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला. मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या चारकोप पोलिसांनी सांगितले की, अभिनेता एजाज खानविरुद्ध अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाईल फोन बंद होता. एजाज खान पोलिसांच्या संपर्कातून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. असे सांगितले जात आहे की एजाज खानने अभिनेत्रीला प्रपोज केले होते आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्याने हा बलात्कार केला. एवढेच नाही तर एजाज खानने महिलेला तिचा धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. बलात्कारासोबतच एजाज खानवर समाजात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शो दरम्यान एजाजने स्पर्धकांना अश्लील कृत्ये करण्यास सांगितले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी एजाज खान आणि उल्लू अॅपवर कारवाईची मागणीही केली. उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सर्व भाग काढून टाकले आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार, पोलिसांकडून शोध सुरू Read More »

सरन्यायाधीशांपासून ते 33 न्यायाधीशांपर्यंत, सर्वांनी जाहीर केली संपत्ती, जाणून घ्या सर्वकाही

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 33 विद्यमान न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक करून देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. आता सर्व न्यायाधीशांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक मालमत्तेची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. न्यायाधीशांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये फ्लॅट, घरे, शेती जमीन, वडिलोपार्जित मालमत्ता, बँक खाती, दागिने आणि शेअर्स यासारख्या मालमत्तांचा समावेश आहे. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे दक्षिण दिल्लीत 3 बेडरूमचा फ्लॅट आहे. याशिवाय, दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये 4 बेडरूमचा फ्लॅट आहे ज्यामध्ये दोन पार्किंग स्पेस देखील आहेत. गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये त्यांचा 56 टक्के वाटा आहे. याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथील वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांचा वाटा आहे. सरन्यायाधीशांनी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या मालमत्तेसह त्यांचे बँक खाते, भविष्य निर्वाह निधी, शेअर्स आणि सोने यांची माहिती सार्वजनिक केली आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांची संपत्ती 14 मे पासून भारताचे पुढचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनीही त्यांच्या मालमत्तेची माहिती शेअर केली आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथे त्यांचे घर आणि शेतीची जमीन आहे, जी त्यांना त्यांच्या दिवंगत वडिलांकडून वारशाने मिळाली आहे. याशिवाय, त्यांचे मुंबईतील वांद्रे आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये फ्लॅट आणि नागपूरमध्ये शेती जमीन आहे. न्यायमूर्ती गवई यांनी त्यांचे बँक खाते, सोने आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता देखील जाहीर केली आहे.

सरन्यायाधीशांपासून ते 33 न्यायाधीशांपर्यंत, सर्वांनी जाहीर केली संपत्ती, जाणून घ्या सर्वकाही Read More »

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले

Nitesh Rane: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचा संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान मोदी आहेत आणि यावी ठोस उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पुण्यात हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला असून जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल असं देखील ते म्हणाले. तसेच हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. असेही यावेळी ते म्हणाले. मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीत गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना असून यासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध करण्यात येणार असं देखील ते म्हणाले. तर दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या असून सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशी कबुली देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले Read More »

पहलगाम हल्ल्यानंतरही ठाकरे कुटुंब परदेशात पर्यटनात मग्न, खासदार मिलिंद देवरांची सडकून टीका

Milind Deora : काश्मीरमधील पहलगामध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यावर सहानुभूती न दाखवणाऱ्या ठाकरे परिवाराची प्रतिमा भूमीपूत्र ते भारताची पर्यटक अशी तयार झाली असल्याची सडकून टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनैतिक दौरा सोडून तातडीने मायदेशी परतले मात्र उबाठा कुटुंब परदेशा सहलीचा आनंद घेण्यात मग्न आहे. पार्टटाइम राजकारणाला महाराष्ट्रात यापुढे थारा नाही, अशी टीका खासदार देवरा यांनी केली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला तातडीने गेले. त्यांनी पर्यटकांशी संवाद साधला आश्वस्त केले. महाराष्ट्रातील 500 हून अधिक पर्यटकांना शिंदे यांच्या तत्परतेने राज्यात सुखरुप आणण्यात आले. मात्र त्यावेळी ठाकरे कुटुंब युरोपात सुट्ट्यांचा आनंद घेत होते. पहलगाम हल्ल्यानंतर उबाठा परिवाराच्या सदस्यांनी सोशल मिडिया हॅंडलवरुन मेसेज केले, मात्र त्यांना मृतांच्या कुटुंबियांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यास वेळ मिळाला नाही, असा टोला खासदार देवरा यांनी यावेळी लगावला. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना स्वत:ला भूमीपूत्रांचे कैवारी समजणारे उबाठा मागील दोन आठवड्यांपासून परदेशात आहेत, असे खासदार देवरा म्हणाले. केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील उबाठा गटाचा एकही खासदार उपस्थित राहिला नाही. नुकताच 1 मे रोजी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठीही उबाठा कुटुंबाला वेळ मिळाला नाही. त्यांनी यासंदर्भात साधे ट्विट देखील केले नाही. त्यामुळे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केवळ शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करत आहेत, अशी खात्री महाराष्ट्रातील जनतेला झाली आहे. पर्यटकांप्रमाणे येऊन भारतात राजकारण करणे आणि इतर वेळ परदेशात राहणे, अशा प्रकारचे पार्टटाइम राजकारण यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही, असे खासदार देवरा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्टटाइम राजकारणाला दिल्लीतून हद्दपार केले आता महाराष्ट्रात पार्टटाइम राजकारणाला थारा नाही, असे खासदार देवरा म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतरही ठाकरे कुटुंब परदेशात पर्यटनात मग्न, खासदार मिलिंद देवरांची सडकून टीका Read More »

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, ‘या’ वेबसाइडवर पाहता येणार निकाल

12th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. 5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1) https://results.digilocker.gov.in 2) https://mahahsscboard.in 3) http://hscresult.mkcl.org 4) https://results.targetpublications.org 5) https://results.navneet.com 6) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams 7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results 8) https://www.indiatoday.in/education-today/results आणि 9) https://www.aajtak.in/education/board-exam-results परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, ‘या’ वेबसाइडवर पाहता येणार निकाल Read More »

भारतातील परिस्थिती धक्कादायक, सोशल मीडियावर मात्र वेगळंच चित्र

Maharashtra Politics : देशात गेल्या अनेक दिवसांपासून धर्माचे तसेच जातीचे राजकारणात भर पडताना दिसत आहे.त्यामुळे आज भारत दोन वेगवेगळ्या वास्तवांमध्ये विभागला गेला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ग्लॅमरस, देशभक्तीचा उद्रेक, आर्थिक प्रगतीचे आकडे आणि सत्ताधाऱ्यांचे गोडवे दाखवणारी मंडळी आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर  शेती संकट, बेरोजगारी, महागाई, प्रशासनाचा ढिसाळपणा आणि नागरिकांच्या जीवनात आलेली अस्थिरता दिसून येत आहे. सोशल मीडियाचे स्वप्नील वास्तव आज सोशल मीडियावर “न्यू इंडिया”चे जे चित्र रंगवले जात आहे, त्यात भारताला एक विश्वगुरु, मजबूत आणि अस्मितेने भरलेला देश म्हणून सादर करण्यात येत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर देशाची प्रतिमा अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित दाखवली जात आहे. पंतप्रधानांचे भाषण, सरकारी योजनांचे व्हिडीओ, तरुणांनी यश मिळवलेले प्रेरणादायक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या यंत्रणाही सोशल मीडियावर अग्रेसर असून विशिष्ट विचारसरणीचे ट्रेंड पुश करण्याचे काम नेटकेपणाने करत आहेत. यातच पारंपरिक मीडियाचा (विशेषतः टीव्ही न्यूज चॅनेल्सचा) सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक मुख्यधारेतील चॅनेल्स सत्तेच्या जवळ गेले असून विरोधकांच्या टीकेपेक्षा राष्ट्रवादाचे बेमालूम प्रदर्शन करण्यात अधिक रस घेतात. यातून निर्माण होणारी एक बाजू म्हणजे ‘सगळं काही ठिक आहे’ असा समज जनतेत रुजवला जातो. ग्रामीण व स्थानिक भारताचं वेगळं वास्तव पण या सर्व ग्लॅमरपलीकडे, जो माणूस खऱ्या अर्थाने भारताची नाडी सांगतो. तो सामान्य नागरिक त्याचं वास्तव खूप वेगळं आहे. ग्रामीण भागात अजूनही सिंचनासाठी पुरेशी पाणीव्यवस्था नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ कागदावरच आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळवण्यासाठी कष्टकरी लोकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागते. शहरांमध्येही परिस्थिती फार वेगळी नाही. लाखो शिक्षित युवक रोजगाराच्या शोधात आहेत, पण सरकारच्या आकड्यांमध्ये बेरोजगारी दर कमी असल्याचं भासवण्यात येतं. आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, महागाई, भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासीनता ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब मुख्यधारेतील मीडियात फारसे दिसत नाही. सत्य दडपण्याचे धोरण माहितीचा युगात माहितीचाच वापर करून सत्य लपवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. सोशल मीडियावर जे चित्र दिसतं ते व्यवस्थेने तयार केलेलं आहे. प्रत्येक टीका ‘राष्ट्रद्रोह’ ठरवली जाते. ज्या पत्रकारांनी, समाजकर्मींनी, किंवा सामान्य नागरिकांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यामुळे एक प्रकारचं भयाचं वातावरण निर्माण झालं आहे. वाटचाल कोणत्या दिशेने? या साऱ्या परिस्थितीत प्रश्न असा उरतो की, देश कुठल्या दिशेने चाललाय? जर मिडिया आणि सोशल मीडियावरून मिळणारी माहिती खोटी, अपूर्ण किंवा व्यवस्थेनं नियंत्रित असेल, तर सामान्य माणसाला सत्य कसं कळणार? लोकशाहीची खरी ताकद ही मोकळ्या संवादात असते. पण आज तो संवादच एकसुरी आणि व्यवस्थानुरूप झाला आहे.

भारतातील परिस्थिती धक्कादायक, सोशल मीडियावर मात्र वेगळंच चित्र Read More »

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, हार्वर्ड विद्यापीठाचा कर सवलतीचा दर्जा संपुष्टात येणार

Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठात सुरु असणारा वाद आता पेटला असून या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत हॉर्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉर्वर्ड विद्यापीठ अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी एक आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरु असणारे निषेधांवर बंदी घालण्यासह व्यापक सुधारणांच्या अंमलबजावणीची मागणी केली होती मात्र हॉर्वर्ड विद्यापीठाकडून ही मागणी फेटाळण्यात आल्याने विद्यापीठ आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात वाद सुरु झाला होता. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, आम्ही हॉर्वर्डचा करमुक्त दर्जा काढून घेणार आहोत, विद्यापीठ याला पात्र नाही. असं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेत विद्यापीठाला दिले जाणारे $2.2 अब्ज अनुदान थांबवले आहे. हॉवर्ड याविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. कॅम्पसमध्ये यहूदीविरोधी निदर्शने विद्यापीठाचे अध्यक्ष ॲलन एम. गार्बर यांनी आरोप केला आहे की ट्रम्प प्रशासन विद्यापीठावर अनावश्यक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने ऑक्टोबर 2023 नंतर विद्यापीठ कॅम्पसमध्ये यहूदी-विरोधी आणि मुस्लिम-विरोधी पक्षपातीपणाचा अहवाल मागवला आहे. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की विद्यापीठाने त्यांच्या कॅम्पसमध्ये यहूदी-विरोधी भावना कायम राहू दिल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाची इच्छा आहे की विद्यापीठाने सर्वसमावेशक कार्यक्रम आयोजित करावेत, निषेधांमध्ये मास्क वापरण्यावर बंदी घालावी, तसेच गुणवत्तेवर आधारित भरती आणि प्रवेश सुधारणांचा पाठपुरावा करावा, परंतु विद्यापीठ यासाठी तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, हार्वर्ड विद्यापीठाचा कर सवलतीचा दर्जा संपुष्टात येणार Read More »

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Ajit Pawar: माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे आज निधन झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणकाका जगताप यांच्याबद्दल सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, “माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली Read More »