Sanjay Kumar: निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे प्राध्यापक संजय कुमार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल चुकीची आकडेवारी दिल्याने त्यांच्याविरुद्ध नागपूरनंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांचा डेटा शेअर करताना खोटी विधाने केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी नागपूर जिल्ह्यात आणि नाशिकमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संजय कुमार यांच्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्य विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे. या दोन्ही निवडणुका सुमारे सहा महिन्यांच्या अंतराने घेण्यात आल्या. नंतर त्यांनी मंगळवारी ही पोस्ट हटवली आणि दुसऱ्या पोस्टमध्ये चुकीचा डेटा पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या तहसीलदारांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येतील फरकाबाबत केलेल्या दाव्याबाबत तक्रार दाखल केली आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 175 (निवडणुकीसंदर्भात खोटे विधान), 353 (1) ब (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), 212 (सार्वजनिक सेवकाला खोटी माहिती देणे) आणि 340 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या नायब-तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या पोस्टमध्ये नमूद केले होते की (2024) लोकसभा निवडणुकीदरम्यान देवळाली मतदारसंघात मतदारांची संख्या 4,56,072 होती, तर प्रत्यक्षात मतदारांची संख्या 2,76,902 होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, संजय कुमार यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवळालीतील मतदारांची संख्या 2,22,141 असल्याचे कथितपणे सांगितले होते, जे दिशाभूल करणारे आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल बीएनएसच्या संबंधित कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.