Santosh Pandit : सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणाऱ्या संतोष पंडित याच्याविरोधात महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे आणि परवानगीशिवाय मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सोमवारी (30 मार्च) टिळक रस्त्यावर ही घटना घडली. नाशिकमधील खरात प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी संतोष पंडित घटनास्थळी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त करत गैरवर्तन करू लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने संबंधित पत्रकाराबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली तसेच अश्लील हावभावही केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, पंडितने केवळ संबंधित पत्रकारालाच नव्हे तर आंदोलनात सहभागी इतर महिलांनाही धमकावण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, महिलेच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे.
महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.






