DNA मराठी

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल.

प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल.

यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *