Baramati By-election: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रारूप मतदार यादीवर बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे. तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.
प्राप्त दावे व हरकतीवर शुक्रवार ६ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून मंगळवार १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले.
7 हजाराहून अधिक मतदारांची वाढ
बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार ६०८ इतके मतदार असून आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी आहे.
या कालावधीत ७ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९२ हजार ८१९ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९६ हजार १०२ इतके मतदार असून यामध्ये ३ हजार २८३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत महिला मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार ७६५ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९२ हजार २४५ इतके मतदार असून यामध्ये ४ हजार ४८० इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. मतदारसंघात तृतीयपंथी मतदार संख्या २४ असून यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहिती डुडी यांनी दिली.






