Ajit Pawar : राज्यात अजितदादांवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलं माहीत आहे. त्यामुळेच उबाठा गटाच्या शरद कोळीनामक नेत्याने टीका करण्याअगोदर रात्री सोलापूरहून सिध्देश्वर एक्स्प्रेस ट्रेन पकडून मातोश्री गाठावी आणि मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले उध्दव ठाकरेंनी अजितदादा पवार यांना अर्थखातं का दिले असा जाब विचारावा शिवाय कोविड काळात राज्याची आर्थिक घडी कुठेही बिघडू न देता अत्यंत उत्तमपणे अर्थ खातं सांभाळलं अशा प्रकारची स्तुती दस्तूरखुद्द उद्धव ठाकरेंनी केली होती याचाही जाब विचारावा ते अधिक संयुक्तिक राहील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्यांच्या आरोपाला उत्तर देताना लगावला आहे.
अजितदादा पवारांनी आपली सोलापूरची भूमिका स्पष्ट केलेली आहे विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेबद्दल अजितदादांवर टीका करत आहेत. मात्र सोलापूर हा विषय संपलेला आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर विषय राष्ट्रवादीसाठी संपला…
सोलापूर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फेसबुक पोस्ट व ट्विटरवर स्पष्ट केले आहे की, सोलापूरमध्ये कायदेशीर कारवाईवर बाधा यावी अशा प्रकारे फोन केला नाही किंबहुना तिथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तिथे हस्तक्षेप केला होता. अजितदादा पवारांनी महिला पोलिस दलातील सर्वच महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचे राज्य असले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपले ट्विट डिलीट केले आहे आता या विषयावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस बोलू इच्छित नाही असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.