Ahilyanagar News : अन्न व औषध प्रशासनाने १५ ऑक्टोबर २०२० रोजी अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई करत जप्त केलेल्या प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणात व्यापारी शुभम रमणलाल भळगट (वय २४, रा. शेरकर गल्ली, तेलीखुंट) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात दोष सिद्ध न झाल्यामुळे भळगट यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
सदर प्रकरणात मधुकर पवार (वय ३३), अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून कारवाईची नोंद झाली होती. फिर्यादीनुसार, १३ लाख ९१ हजार ७२९ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा शुभम जनरल स्टोअर्समधून मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते.
फिर्यादीत शुभम भळगट यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवले हिरा पान मसाला, सुगंधित तंबाखू ,गोवा,वी 1 तंबाखू , राजश्री पान मसाला असल्याचा आरोप होता. तसेच त्यांनी पुरवठादाराची माहिती न दिल्याचे आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायदा २००६ तसेच भादंवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी यंत्रणेकडून आरोप सिद्ध करण्यास आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने, आणि कारवाईतील प्रक्रियात्मक त्रुटींमुळे न्यायालयाने भळगट यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात अॅड. स्नेहा लोखंडे यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला असून, जोशना ससाणे यांनी त्यांना सहकार्य केले.