Sawedi land Scam l या प्रकरणात मूळ जमीन मालक कोण, आणि खरे घेणारे-देणारे कोण? याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही बाजूंना उद्यापर्यंत त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, आता अप्पर तहसीलदार काय अहवाल पाठवणार हे अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
अहमदनगर – सावेडी येथील तब्बल १.३५ हेक्टर भूखंडावर (सर्वे नं. २४५/ब-१ व २४५/ब-२) गेले ३५ वर्षे कोणताही अधिकृत व्यवहार न झालेली जमीन अचानक चर्चेत आली आहे. अलिकडच्या काळात या जमिनीवर कोट्यवधींचा व्यवहार करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली असून, यासाठी महसूल विभागावर दबाव आणल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.
या प्रकरणात आधी नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी वस्तुनिष्ठ चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले. मात्र या तपासाला अचानक वेगळे वळण देत, प्रकरण अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या कक्षात वर्ग करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता अप्पर तहसीलदार कार्यालयात सुनावणी पार पडली.
या सुनावणीत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर, मंडळ अधिकारी सावेडी, तलाठी सावेडी, तसेच डायाभाई कुटुंबीय, रमाकांत नामदेव सोनवणे, गणेश शिवराम पाचरणे (मुखत्यार) यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काहींनी आपली बाजू तोंडी मांडली तर काहींनी लेखी युक्तिवाद सादर केला. डायाभाई यांच्या वारसांनी ‘आमच्याशी न बोलता जमिनीवर नावे कशी लावली?’ असा थेट सवाल उपस्थित करत वातावरण तापवले.
या प्रकरणात मूळ जमीन मालक कोण, आणि खरे घेणारे-देणारे कोण? याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही बाजूंना उद्यापर्यंत त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, आता अप्पर तहसीलदार काय अहवाल पाठवणार हे अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
या भूखंड प्रकरणात मुखत्यारांच्या माध्यमातून व्यवहार घडवले जात आहेत, मात्र मूळ मालकांचे व त्यांच्या वारसदारांचे कायदेशीर हक्क, सहमती व अस्तित्व धूसर असल्याने हा संपूर्ण प्रकार फसवणुकीच्या दिशेने वळल्याचा संशय नागरिकांमध्ये वाढत आहे. सावेडीतील बहुमूल्य जमिनीवर सुरू असलेल्या ‘गुप्त’ हालचालींमुळे महसूल यंत्रणेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली नाही, तर हा घोटाळा केवळ सावेडीचा नाही, तर संपूर्ण शहर प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच घाला ठरेल.