Ahmednagar News : शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
फिर्यादी ऋषिकेश देविदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तुर 27 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.
सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी याने व त्याचे साथीदाराने केला असून आता ते हा शेतमाल विक्रीकरीता पारनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचुनवैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश अजिनाथ गोलवड, किरण संजय बर्डे आणि साहील नामदेव माळी या आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामधून 96,000 रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तुर, 30,000 रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन व 8,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकुण 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणेमध्ये भादवि कलम 379, 342 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.