DNA मराठी

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल

Sujay Vikhe: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक झाली. पुणे जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी शामसुंदर गुजर या पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर हा सध्या अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत आहे. तो पूर्वी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पारनेरच्या बाँण्ड्रीवरील पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये ड्रग्जच रॅकेट सापडलं. त्याचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचले. पारनेर आणि ड्रग्ज हे समीकरण उघड झालं. अहिल्यानगरच्या पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या तपासातील सगळं सत्य पत्रकारांना सांगावं, अशी अपेक्षा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखेंनी या प्रकरणावर काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या.

ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणात, नगरमधील पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पत्रकारांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रकरणात आपली भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी विखेंना विचारला. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या उत्तराने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुजय विखे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी हा पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरोधात पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी करुन त्याची बदली करण्याची मागणीही त्यावेळी झाली होती. वादग्रस्त असलेल्या या पोलिसाची बदली थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी मोठ्या नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलिस घेतल्याचे सांगतात. मग त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरुन घेतलं गेलं, हे पोलिस अधिक्षकांनी सांगावं. आत्ताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते. मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावं पोलिस का सांगत नाहीत. ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावं गुन्ह्यात येऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होतं? हे सगळं मला माहित आहे. परंतु पोलिसांनी हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगावं, असंही विखेंनी स्पष्ट केलं.

सुजय विखेंनी ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणावर आपली भुमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्वतः सांगावं. मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा पुढच्या आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करु. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी, असंही विखेंनी स्पष्ट केलं. विखेंनी कोणत्याही लोकप्रतिनीधींचं नाव घेतलं नसलं तरी, दक्षिणेचे खा. निलेश लंके यांच्याकडे संशयाची सुई असल्याच्या चर्चा आहेत. ज्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले होते, ते खा. लंके यांचे कार्यकर्ते होते का? हा प्रश्नही विचारला जात आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेमध्ये लोकसभा निकालानंतर झालेल्या राड्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, मी काल आजारी असल्याने हे प्रकरण संपूर्ण पाहिलं नाही. परंतु त्यावेळी एका गर्भवती महिलेला मारहाण झाली होती. लोकप्रतिनीधींच्या कुटुंबातील व्यक्तीने असं करणं, हे गंभीर आहे. आपला न्यायालयावर विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *