Sangali News : सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र, वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी शक्कल लढवली आहे. शेतात बिबट्या येऊ नये म्हणून त्यांनी चक्क बियरच्या रिकाम्या बाटल्या आणि नट-बोल्टचा वापर करून एक ‘ध्वनी यंत्र’ तयार केले आहे. त्यांच्या या अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांची मळ्यामध्ये वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीवरील जनावरांच्या शेडपर्यंत येत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती. वनविभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणे गरजेचे होते.असे तयार केले ‘स्वदेशी अलार्म’ बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आवाजाला घाबरतात, हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढवली त्यांनी झाडाच्या फांद्यांवर बियरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या.त्या बाटल्यांच्या आत नट-बोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याच्या मंद झुळुकीनेही त्यातून ‘खुळखुळ’ असा आवाज येतो.
काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो. या प्रयोगाचा फायदा असा झाला की, रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्याने बिबट्याला तिथे माणसांची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो. परिणामी, बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले आहे. अत्यंत कमी खर्चात आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे सुरक्षा यंत्र कुरळपमधील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतावून लावता येतं, याचं उत्तम उदाहरण चव्हाण यांनी घालून दिलं आहे.






