Ajit Pawar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सकाळी बारामती हॉस्टेल मधून पोलीस संरक्षण,पोलीस ताफा काहीही न घेता एकटे निघाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके कुठे गेले याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामती हॉस्टेल मधून निघून जिजाई या त्यांच्या निवासस्थानी असण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामती हॉस्टेल मधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्या मध्ये असल्याने अजित पवार देखील जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे युतीसाठी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून लवकरच युती बाबत निर्णय होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत एकत्र लढणार असून काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.






