Rohit Pawar on Congress: जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली आहे. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, जनतेने दोनदा भरभरून मतांचं दान दिलं, मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली, उमेदवारांनी ताकदीने लढा दिला, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक आहे. काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची करणारा हा पराभव आहे. जनतेवर आक्षेप नाही. पण जिथे सर्वत्र पैसाच चालतो, तिथे बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो.
आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर…
आमदार पवारांनी आजच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. तत्त्व, विचार आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी होत चाललंय. पैशांनी गढूळ झालेलंच राजकारण आज जास्त दिसतं. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर चारचौघात त्यांची नावं घेण्याचीही लाज वाटते, असा घणाघात त्यांनी केला.
भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला
सर्वात स्फोटक आरोप करताना पवार म्हणाले, काही अपक्षांसह धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवारालाच स्वतःच्या तिकिटावर उभं केलं. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला. लोकंही या तिरक्या खेळीला बळी पडली. यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा मोठा प्रश्न आहे.
जामखेडच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच आता आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, रोहित पवारांच्या या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.






