IPL Auction 2026: संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी मिनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर सर्वात जास्त बोली लागली आहे. त्याला केकेआरने तब्बल 25.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. तर तो परदेशी खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावरही पोहोचला. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? 25 कोटी बोली लागल्यानंतर ही ग्रीनला फक्त 18 कोटी रुपये मिळणार आहे. बीसीसीआयच्या एका नियमामुळे ग्रीनला 18 कोटी मिळणार आहे.
कॅमेरॉन ग्रीनला फक्त 18 कोटी का मिळणार?
कॅमेरॉन ग्रीनला 2026 च्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 18 कोटी मिळणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे “कमाल शुल्क नियम” नावाचा एक विशिष्ट आयपीएल नियम. या नियमानुसार, कोणत्याही परदेशी खेळाडूला मिनी-लिलावात जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते ती दोन गोष्टींपैकी कमी रक्कम आहे.
त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत?
या नियमानुसार, पहिली, या हंगामासाठी सर्वाधिक रिटेन्शन स्लॅब 18 कोटी आहे. दुसरी, गेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली. ऋषभ पंत आयपीएल 2025 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला, त्याला 27 कोटी मिळाले. या दोन्ही रकमेपैकी कमी रक्कम 18 कोटी आहे. त्यामुळे ग्रीनला 25.20 कोटी ऐवजी फक्त 18 कोटी दिले जातील. उर्वरित रक्कम बीसीसीआयच्या खेळाडू कल्याण निधीत जाईल.
तर दुसरीकडे मिनी लिलावात ग्रीनसाठी संघांमध्ये तीव्र स्पर्धा झाली. कॅमेरॉन ग्रीनची सर्वोत्तम किंमत 2 कोटी ठेवण्यात आली होती. सुरुवातीला, बोली राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाली. पण राजस्थानने माघार घेतल्यावर, चेन्नईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. शेवटी, कोलकाता जिंकला आणि त्याने या खेळाडूला मोठ्या रकमेत त्यांच्या संघात समाविष्ट केले.
दुखापतीनंतर कॅमेरॉन ग्रीनचे पुनरागमन
पाठीच्या दुखापतीतून कॅमेरॉन ग्रीन पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसला नाही. तो मेगा लिलावातही विकला गेला नाही. तरीही कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे केकेआरमधून आंद्रे रसेलची निवृत्ती, कारण त्याची जागा घेणारा एकमेव खेळाडू ग्रीन होता. ग्रीन बॅट आणि बॉल दोन्हीने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.






