DNA मराठी

Balasaheb Thorat :  नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच  करा;  थोरातांची थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवकडे मागणी

img 20251215 wa0009

Balasaheb Thorat :  नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा आधी निश्चित करण्यात आलेल्या मूळ मार्गानेच राबवण्यात यावा, या मागणीसाठी  माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन रेल्वेमंत्र्यांकडे सादर केले.

नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–राजगुरुनगर–चाकण मार्गे पुणे अशी पूर्वी निश्चित करण्यात आलेली नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची मूळ अलाइनमेंट भौगोलिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत योग्य असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “हा मूळ मार्ग केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक आणि पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरणारा आहे. या मार्गामुळे उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.”

2020 मध्ये सुधारित डीपीआर, 2021 मध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी

थोरात यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, या प्रकल्पासाठी 2018 मध्ये प्राथमिक डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक आणि पर्यावरणीय अडचणी लक्षात घेऊन 2019–2020 मध्ये सुधारित डीपीआर तयार करण्यात आला. या डीपीआरला रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी देखील मिळाली होती. याशिवाय 8 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पास अंतिम मंजुरी दिली.

प्रकल्पाचा एकूण खर्च ₹16,039 कोटी निश्चित करण्यात आला असून, त्यातील ₹3,200 कोटी (20 टक्के) हिस्सा राज्य सरकारचा आहे. यासंदर्भात शासन निर्णय (GR) देखील निर्गमित करण्यात आला होता.

भूसंपादन प्रक्रिया सुरू होती

“मी महसूल मंत्री असताना या मूळ मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भूसंपादनही झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचलेला होता,” असे थोरात यांनी सांगितले.

GMRT चा आधार देत मार्ग बदलण्यावर नाराजी

अलीकडेच संसदेत दिलेल्या निवेदनात नाशिक–पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलल्याचे जाहीर करण्यात आले. GMRT चा आधार देत मूळ अलाइनमेंट बदलण्यात आल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे थोरात यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.

“नाशिक–शिर्डी किंवा अहिल्यानगर–पुणे मार्गाला आमचा विरोध नाही. मात्र नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही मूळ मार्गानेच झाली पाहिजे, ही या भागातील नागरिकांची ठाम अपेक्षा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या भावना थेट मंत्र्यांपर्यंत

या भेटीदरम्यान बाळासाहेब थोरात यांनी मूळ मार्गावरील नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि विकासाच्या आशा रेल्वेमंत्र्यांपर्यंत सविस्तरपणे पोहोचवल्या. “हा मार्ग आत्ताच रेल्वेने जोडला गेला नाही, तर पुढील अनेक दशके या भागाला संधी मिळणार नाही. त्यामुळे ही लढाई केवळ एका नेत्याची नसून, संपूर्ण परिसराच्या भवितव्याची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *