Leopard Attack: अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात काल (१२ नोव्हेंबर) सायंकाळी बिबट्याने पाच वर्षांच्या रीयंका पवार हिला उचलून नेले होते. तब्बल १६ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी काटवण परिसरात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला आणि गावात शोककळा पसरली मात्र या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा राग अनावर झाला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेत ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला पकडत नाही किंवा ठार मारत नाही, तोपर्यंत रीयंका पवार हिचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वेळीच पिंजरे लावले असते तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गावात वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस व वनविभागाचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून गाव सुरक्षित नाही, बिबट्याला ठार मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.






