DNA मराठी

Ahilyanagar News : ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करा

auto

Ahilyanagar News : राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी सभासद म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे.

मंडळामार्फत चालकांना जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण योजना आदी विविध लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा.

नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार आणि पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करून आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. कार्यालयाकडून पडताळणी केल्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जाईल. अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदाराला मोबाईलवर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबत संदेश प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर आपली नोंदणी स्थिती तपासूनच पुढील प्रक्रिया करावी.

सभासद नोंदणी शुल्क ₹५०० आणि वार्षिक सभासद शुल्क ₹३०० अशी एकूण ₹८०० रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाले आहात” असा संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *