Sawedi land scam – अहिल्यानगर – सावेडी येथील गट क्रमांक 245 ब/1 मधील तब्बल बहात्तर गुंठे जमिनीच्या मालकीबाबत गंभीर गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जमिनीवर अद्याप सातबारा उताऱ्यावर साजिद डायाभाई व अजिज डायाभाई यांचीच नावे आहेत. नुकतीच त्यांच्या वारसांनी वारस नोंदणीसाठी अर्ज दाखल केला असतानाच, त्याची नोंद पूर्ण होण्याआधीच खरेदी-विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
याच प्रकरणाशी संबंधित सूची क्रमांक 2 वरून खरेदीचे डावपेच रचले जात असल्याचे समोर येत असून, सर्वे नंबर 245 ब/2 संदर्भातील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. यामध्ये प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाने काही महत्त्वाचे दस्तावेज गायब असल्याचे लेखी मान्य केले असतानाही त्याबाबत कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. तरीदेखील या संशयित जमिनीच्या खरेदी-विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याने निबंधक कार्यालयाच्या भूमिकेवर संशय अधिकच गडद झाला आहे.
सावेडीतील सर्वे नंबर 245 ब/1 (72 गुंठे) आणि 245 ब/2 (63 गुंठे) या दोन गटांबाबत अद्याप कोणताही प्लॅन मंजूर नाही. तरी 72 गुंठ्याची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असून, 63 गुंठ्याची जागा ॲमेनिटी व ओपन स्पेस म्हणून दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या भूखंडाच्या व्यवहारावर सुनावणी सुरू असतानाही विक्रीची घाई का, असा सरळसरळ प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूनपणा करून संशयास्पद खरेदीखताला वैधतेची छत्रछाया मिळवून देण्याचे डावपेच रचले, अशी चर्चा परिसरात आहे. विशेष म्हणजे 1990 ते 1993 या कालावधीतले महत्त्वाचे दस्तावेज रेकॉर्ड रूममधून गायब झाल्याचेही पुढे येत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
या संपूर्ण प्रकरणात निबंधक कार्यालयाचा संशयास्पद कारभार उघड झाला असून, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, हा प्रश्न शेतकरी व नागरिक विचारत आहेत. याबाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तीव्र स्वरूपात केली आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या जमिनीवरील संशयास्पद व्यवहार रोखले नाहीत, तर सावेडीतील भूखंड प्रकरण हा नगर जिल्ह्याचा आणखी एक गाजणारा घोटाळा ठरेल, यात शंका नाही. आणि याचा परिणाम येणाऱ्या कळात अहिल्यानगर मधील इतर जागेंचा विषय गंभीर होणारा आहे.