Ganesh Visarjan 2025 : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भिवंडी शहरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या निमित्ताने परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई, भाईंदर, ठाणे आणि भिवंडी परिसरात पाच ते साडेपाच लाख वडापावचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तब्बल एक ते दीड लाख वडापाव भक्तांना वाटप करण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परोपकार संस्थेच्या वतीने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वडापाव वाटपाची परंपरा पुढे नेण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही संस्था गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेश भक्तांना वडापाव वाटपाची सेवा देत आहे. यावर्षी देखील या सेवेसाठी तब्बल एक महिन्यापासून तयारी करण्यात आली आहे.
या सेवेसाठी 100 ते 150 कामगार 24 तासांपासून वडापाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत.
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच, या वडापावचे वितरण परोपकार संस्थेच्या स्वयंसेवकांकडून करण्यात येत असतो, अशी माहिती आयोजकांनी दिली. गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने भिवंडीमध्ये भक्तगण मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक दुकानं बंद असतात आणि त्यामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे एका वेळेची नाश्त्याची व्यवस्था त्यांची व्हावी यासाठी या संस्थेच्या वतीने वडापाव चे वितरण करण्यात येत असतो.
विविध मंडळांच्या मिरवणुका शहरातील प्रमुख चौकांतून पार पडत असून भाविक उत्साहात या उपक्रमात सहभागी होत असतात.