maharashtra politics – मुंबई – dna मराठी टिम – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातले समीकरण दिवसागणिक बदलत आहेत. एकीकडे महायुतीचे सरकार आहे. यात भाजपा, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिघांचा सत्तेत समावेश आहे. परंतु या तिघांचे नाते अजून स्थिर झालेले दिसत नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना असून विरोधक म्हणून ते एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज्यातात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्था आणि महानगर पालिका. यात सर्वधिक महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महानगर पलिक या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. “जनतेच्या मनात काय आहे तेच आम्ही करणार” या ठाकरे बंधूंच्या विधानांनी चर्चेला अधिकच उधाण आले आहे. मराठी अभिमान, महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न, तसेच ‘मराठी माणूस’ या मुद्द्यावर या दोन्ही ठाकरे एकत्र आले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठे समीकरण ठरू शकते. दोन्ही ठाकरेंचे एकत्र येणे ही घटना केवळ विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधाऱ्यांसाठीही चिंतेची बाब ठरेल.
दरम्यान, महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही, हे अलीकडच्या घडामोडींवरून स्पष्ट दिसते. नाशिक येथील मेळाव्यात लागलेली काही पोस्टर आणि त्यातून उमटलेला संदेश, शिंदे गटातील अस्वस्थता, तसेच अजित पवार गट व भाजपामधील अदृश्य तणाव या गोष्टी उघड झाल्या आहेत.
त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या खरी ओळख ठरवण्यासाठीचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या निकालावर महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय समीकरणांचा मोठा भाग अवलंबून आहे. जर न्यायालयाचा निकाल शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर सध्याच्या सत्तासमीकरणाला मोठा धक्का बसेल. एकनाथ शिंदे यांची पुढची भूमिका काय असेल – ते भाजपात विलीन होतील की स्वतंत्र ओळख राखण्याचा प्रयत्न करतील, हा महत्त्वाचा प्रश्न ठरेल. तसेच अजित पवारांचा गट जर शरद पवारांकडे परत गेला, तर शरद पवार सत्तेत जाण्यास तयार होतील का, की ते पुन्हा आघाडीच्या राजकारणाला नवा आकार देतील, हे पाहणे रंजक ठरेल.
याशिवाय अलीकडेच शिंदे गटातील काही नेत्यांवर ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. अशा चौकशा आणि दबावामुळे अंतर्गत नाराजी अधिक टोकदार होऊ शकते.
एकंदरीत, महाराष्ट्राचे राजकारण सध्या अनिश्चिततेच्या टप्प्यात आहे. ठाकरेंची युती, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, शिंदे यांचा निर्णय आणि भाजपाची धोरणे — या सर्व घटकांचा भविष्यातील समीकरणांवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा नवे गणित उभे राहू शकते.