DNA मराठी

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय

controversial decision of ncp ajit pawar group to give suraj chavan a chance as state general secretary

Ajit Pawar – Sunil Tatkare – Suraj Chavan

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) NCP मध्ये अलीकडेच युवक प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेल्या सूरज चव्हाण ( Suraj Chavan) यांना पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. अल्पावधीतच त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सूरज चव्हाण यांना काही दिवसांपूर्वीच पक्षशिस्तभंगाच्या कारणास्तव पदावरून दूर करण्यात आले होते. परंतु, अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वातील निर्णयप्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात निष्ठा आणि संघटन कौशल्य याला महत्त्व देण्यात येते, असे सांगत समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, विरोधकांनी या संधीला “निलंबनाचे नाटक” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

युवकांमध्ये चव्हाण यांचा ठसा उमटलेला असला तरी त्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. “एका बाजूला शिस्तभंगाच्या नावाखाली शिक्षा आणि दुसऱ्याच बाजूला बढती, हा दुहेरी मापदंड” असा सूर व्यक्त होत आहे. काही कार्यकर्त्यांनीही आतल्या गोटात नाराजी दाखवली असल्याची माहिती मिळते.

दरम्यान, अजित पवारांनी मात्र या नेमणुकीला संघटन मजबुतीसाठी आवश्यक पाऊल असे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे. महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात सूरज चव्हाण यांना अधिक सक्रीय भूमिका मिळणार असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, त्या नंतर लातूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावर लातूरमध्ये होते.

सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकार परिषदेत पत्ते फेकत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तटकरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले, परंतु यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली.

सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या घटनेनंतर सामाजिक व राजकीय स्तरावर तीव्र टीका झाली. परिणामी, अजित पवारांनी चव्हाण यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली होती.

मात्र, काही महिन्यांतच सुरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. निलंबनानंतर मिळालेली ही बढती नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर झाली, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात अजित पवार गटाचा हा निर्णय पक्षासाठी फायदेशीर ठरेल की नवे वाद निर्माण करेल, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *