DNA मराठी

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता

Ram Shinde : जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. २१.१३ लाख खर्च मंजूर असून, तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केला जाणार आहे. यामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होईल व पाणी साठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळेल.

महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर) येथे सुमारे रु. १२०९ कोटींचा बृहद विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात चौंडी परिसरातील ऐतिहासिक व पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.

६ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत “श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यास” मंजुरी देण्यात आली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा शासन दरबारी मंजूर झाला. यामध्ये सिना नदी सुशोभीकरण, नदीपात्र स्वच्छता, शुद्धीकरण व दोन बुडीत बंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.

विकास आराखड्याचा निधी तपशील :-

चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन – रु. ६८१ कोटी ३२ लाख

चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे – रु. ३६० कोटी

सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे – रु. ५० कोटी

एकूण – रु. १०९१ कोटी ३२ लाख

या निर्णयाचे स्थानिक नागरिक, विविध समाजघटक व सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेशी अशी चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी होईल व सिना नदीवरील बुडीत बंधारे प्रकल्पामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *