मुंबई | प्रतिनिधी –
DA Hike – स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा निर्णय घेतला आला आहे. महागाईच्या झळा सहन करत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता (DA) राज्य सरकारने तब्बल २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, हा लाभ १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पगारात वाढीव भत्ता जमा होणार असून, कर्मचाऱ्यांच्या खिशात काहीशे रुपये जास्त येणार आहेत. वाढती बाजारपेठ, रोजचे वाढणारे खर्च आणि घरगुती गरजांचा ताण यामध्ये ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासा ठरणार आहे.
“सरकारने दिलेली ही छोटीशी का होईना, पण वेळेवर मिळालेली मदत आहे,” असे अनेक कर्मचारी संघटनांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या खजिन्यावर वार्षिक कोट्यवधी रुपयांचा भार पडणार असला तरी जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांत पेन्शनधारकांना दिलेल्या सुविधा, कर्जावरील सवलती यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर मिळालेला हा भत्तावाढीचा ‘गोड दिलासा’ नक्कीच स्मरणात राहील.