अहिल्यानगर | प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात गावातील सरपंचपतीने मध्यस्थी करत कथितपणे आर्थिक तडजोड घडवून आणल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
पीडित मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती असून, तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या मोबदल्यात मौन बाळगण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सरपंचपतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, पीडिता अल्पवयीन असल्यामुळे हा प्रकार ‘पॉक्सो कायद्या’च्या (Protection of Children from Sexual Offences Act) चौकटीत येतो. मात्र, अद्यापही या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, तसेच पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
स्थानिक पातळीवर दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे संपूर्ण प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पीडितेला न्याय मिळावा, आरोपी शिक्षकाला निलंबित करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.
दरम्यान, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषदेने या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
प्रमुख मुद्दे:
- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
- सरपंचपतीकडून मध्यस्थी; आर्थिक तडजोडीची चर्चा
- अजूनही कोणतीही अधिकृत तक्रार नाही
- ग्रामस्थांमध्ये रोष; कारवाईची मागणी






