Sawedi land Scam पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला
Sawedi Land Scam : सावेडी येथील कोट्यवधींचा वादग्रस्त भूखंड घोटाळा प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर कार्यालयात खरेदी-विक्री थांबवण्याचे प्रशासनाने पत्र दिल्यानंतर, आता काही मंडळींनी तालुकास्तरावरील कार्यालयांमार्फत व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधितांनी पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत हा व्यवहार पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं दिसत आहे.
विशेष म्हणजे, सावेडीमधील सर्वे नं. २४५/ब १ (०.७२ हेक्टर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या भूखंडावर गेल्या ३५ वर्षांत कोणताही अधिकृत व्यवहार झालेला नाही. मात्र सध्या याच जमिनीवर मोठा व्यवहार करण्याचा अट्टहास सुरू असून, संबंधितांच्या वतीने महसूल विभागावर दबाव आणण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असून, मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तु निष्ठा अहवाल मागवण्यात आला आहे.
तसेच वादी-प्रतिवादींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावेत, अशा असे पत्र दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ या सह दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पोलीस यंत्रणेकडेही या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून, या संदर्भात पुढील तपास सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तालुकास्तरावरील इतर नोंदणी कार्यालयांतून व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे, यापुढील काळात पोलीस आणि महसूल यंत्रणांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.