DNA मराठी

Sawedi land Scam सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

Sawedi land Scam : अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे.

सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय?

आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते.

यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे?

या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो..

कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.