DNA मराठी

Sharad Pawar: मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ५ जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले.

खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला.

महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे.

महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *