Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज
मोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे.
तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे.
स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी
वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला.
केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं.
म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.