Beed News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून जर आरोपींना शिक्षा झाली नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग ता. केज, जि. बीडचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून अतिशय निर्दयीपणे त्यांचे डोळे काढून खून करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे. याप्रकरणाबाबत आम्ही मागण्या करतो की, संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना व केजच्या पोलीस निरीक्षकांचे निलबंन करून त्यांना सहआरोपी करावे. हे प्रकरण सीआयडीकडे हस्तातरीत करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री. शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देवून पुर्नवसन करावे.
आमच्या या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.