Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील रहिवासी असलेले सध्या व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध उद्योगपती तथा डी.एन.के. ग्रुप आणि नहार ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष अशोकलाल झुंबरलाल नहार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मंगळवार दि. ५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बालमटाकळी सह परिसरात होणाऱ्या धार्मिक, सामाजिक गावच्या सार्वजनिक कार्यात नेहमी त्यांचा सिंहाचा वाटा असायचा मंदिराच्या तसेच इतर सामाजिक कार्यात मोठे आर्थिक योगदान त्यांनी या भागासाठी दिलेले आहे, त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने बालमटाकळी सह पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर पुणे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यविधीला राजकीय, सामाजिक, धार्मिक, व्यापारी यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंत्यविधी झाल्यानंतर शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे, बालमटाकळी सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, युसुबभाई शेख, छगनराव राजपुरे, रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख, विक्रम गरड, अरुण बामदळे यांच्यासह अनेकांनी त्यांना आपआपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली असून युवा उद्योजक चेतन नहार व आदित्य नहार यांचे ते वडील होते तर प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल नहार यांचे ते मोठे बंधू होते.