Parliament Winter Session 2024 : संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
रिजिजू म्हणाले की, संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष सोहळा आयोजित केला जाईल, जो संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल.
रिजिजू म्हणाले, माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत हिवाळी अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त समितीने शेवटच्या अधिवेशनात दिलेल्या मुदतीवर टिकून राहिल्यास 29 नोव्हेंबर रोजी संसदेत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकावर लक्ष
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकाकडे लागले आहे. या दोन मुद्द्यांवरून संसदेत बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे. वन नेशन-वन इलेक्शनच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाईल.
विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत आणि देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने नाहीत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे.
वक्फ विधेयकावरही गदारोळ होण्याची शक्यता
याशिवाय वक्फ विधेयक 2024 वर सुरू असलेला गतिरोध देखील संसदेच्या अधिवेशनात मुद्दा बनू शकतो. खरे तर वक्फ विधेयकावर गठित जेपीसी आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. यावरून विरोधी पक्ष सरकारला विरोध करत आहेत. जेपीसीच्या बैठकीत वक्फ विधेयकाबाबत अनेकदा गदारोळ झाला आहे.