Shrirampur News : श्रीरामपूर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मुद्देमालासह अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला श्रीरामपूरमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो दत्तनगर, श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाचे पोलीस अंमलदार मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड अशांचे पथक तयार करून संशयीतवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने 29 ऑक्टोबर रोजी सुतगिरणी फाटा, रेल्वे फाटकजवळ, दत्तनगर, श्रीरामपूर येथे संशयीत आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले.
इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा (वय 32, रा.काझीबाबा रोड, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर) असं आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून
30,000 रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 1,000 रुपये किंमतीचे 2 काडतुस असा एकुण 31,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 1038/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.