Air India Flight Bomb Threat : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीमुळे सोमवारी विमानाची दिल्लीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे.
सध्या दिल्ली विमानतळावर विमानाचा शोध सुरू आहे. प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बॉम्बच्या धमकीनंतर एअर इंडियाचे मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सध्या IGI विमानतळावर आहे आणि प्रवासी आणि क्रू यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.
तर दुसरीकडे एअर इंडियाने प्रसारमाध्यमांच्या निवेदनात म्हटले आहे की, 14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK ला उड्डाण केलेल्या AI119 ला विशेष सुरक्षा सतर्कता प्राप्त झाली आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी उतरले आहेत आणि दिल्ली विमानतळ टर्मिनलवर आहेत.
प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला प्राधान्य
एअर इंडियाने सांगितले की, या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या पाहुण्यांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी जमिनीवरील आमचे सहकारी काम करत आहेत. एअर इंडिया आपल्या प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य देते.
दोन दिवसांपूर्वी मोठी दुर्घटना टळली होती
दोनच दिवसांपूर्वी एअर इंडियाचे विमान एका मोठ्या अपघाताचे बळी होण्यापासून वाचले होते. तिरुचिरापल्लीहून शारजाहला जाणाऱ्या विमानात शुक्रवारी संध्याकाळी टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच हायड्रोलिक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर, सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी विमानाला इंधन आणि वजन कमी करण्यासाठी आकाशात बराच वेळ प्रदक्षिणा घालाव्या लागल्या.
141 प्रवाशांसह तिरुचिरापल्ली येथून संध्याकाळी 5.30 वाजता उड्डाण घेतलेले विमान रात्री 8.15 च्या सुमारास सुरक्षितपणे उतरले. टेकऑफनंतर काही वेळातच विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये (लँडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रेक, लँडिंग गियर आणि इतर उपकरणे नियंत्रित करणारी यंत्रणा) बिघाड झाला होता.