Dnamarathi.com

Lok Sabha Election :  डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व  कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

 राहुरी येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरसेवक विक्रम भुजाडी, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, संचालक रविंद्र म्हसे, कामगार नेते कारभारी खुळे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, आम्ही कधीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात राजकारण केले नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमी कारखान्याला मदत व सहकार्य करण्याचे काम केले. कै. रामदास पाटील धुमाळ यांच्या काळात देखील बँकेची मदत मिळवून दिली होती. संस्था टिकली पाहिजे, कामधेनू जगली पाहिजे, ऊस उत्पादक सभासद व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका घेण्याचे काम केले. सभासदांनी निवडणुकीत निवडणूक दिलेल्या पॅनलला मदत करण्याचे आम्ही जाहीर केले होते त्यानुसार संचालक मंडळास मदत केली.

 कर्जाचे पुनर्गठन करून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना सुरू केला. कारखाना बंद कसा पडला, सुरू कोणी केला याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. काही दिवसांपूर्वी कामगारांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रश्नासाठी भूमिका घेतली यामध्ये खा.डॉ. सुजय विखे पाटील व आम्हाला काही चूक वाटत नाही. चार वेळा बँकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम झाले. परंतु यामध्ये कामगारांना दुर्लक्षित करून चालणार नाही अशी अट घातली होती. त्यामुळे कोणी पुढे आले नाही. मागील वेळी कामगारांनी आंदोलन केले त्यावेळी सुमारे ८.५० कोटी रुपये फंडाची रक्कम आपण बँकेच्या टॅगिंग मधून मिळवून देण्याचे काम केले.  यापुढे देखील कारखाना सुरू करण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील. तसेच कामगारांचे देणे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी भूमिका मांडताच उपस्थित सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला.

प्रास्तविक करताना युनियनचे सचिव सचिन काळे यांनी सांगितले की, कारखान्याचे कामगार कारखाना गेटच्या आतमध्ये कोणतेही राजकारण करत नाही. मागील निवडणुकीत आम्ही सर्व कामगारांनी एकमताने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचा गावोगावी जाऊन प्रचार केला होता. आम्हाला राजकारण करायचे नाही आमची रोजी रोटी महत्वाची आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे देणे मिळाले पाहिजे आम्ही सर्व कामगार यावेळी देखील खा. डॉ.सुजय विखे यांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग यांनी सांगितले की, डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. खा.डॉ.सुजय विखे पाटील व शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून नेहमीच आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. कामगारांनी मागील वेळी आंदोलन केले त्यावेळी शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीने आम्हाला फंडाचे पैसे मिळू शकले. आता देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कारखाना चालवावा आम्ही सोबत असून आम्ही सर्व कामगार खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा देतो असे सांगितले. 

कारभारी खुळे यांनी सांगितले की, सेवा निवृत्त कामगारांचे देणे अद्याप मिळालेले नाही यासाठी प्रयत्न करावा. सर्व कामगार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे सांगितले. यावेळी बहुसंख्य कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *