Ahmednagar News: जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार, त्यासाठी माझा आरखडा तयार असून त्यात शेतकरी, गरीब- गरजू पासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केले आहे. यामुळे येत्या पाच वर्षात अहिल्यानगरचा विकास हा सर्वासाठी एक उदारण राहणार आहे. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार असून देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याचा विकास कुणी रोखू शकणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाथर्डी जिरेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, राज्याच्या उत्पनात अहिल्यानगरचा वाटा महत्वाचा आहे. जिल्ह्यात सर्विस सेक्टर बरोबर शेतीला सुद्धा मोठा वाव आहे. कृषी-संलग्न क्षेत्रांमध्ये रोजगाराची उच्च क्षमता जिल्ह्यात असल्याचे त्यांनी सुजय विखे यांनी सांगितले. म्हणुन कृषी-प्रक्रिया, अन्न उत्पादन आणि कृषी-पर्यटन अशा कृषी-संबंधित उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पर्यटन क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे. यामुळे जिल्ह्यात एमआयडीसीच्या माध्यमातून देशी परदेशी गुंतवणुक आणुन जिल्ह्याची उत्पादन क्षमता कशी वाढली जाईल यावर भर देणार. त्यासाठी रस्ते, वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात कृषी प्रयोगशाळांची निर्मीती केली जाईल. तर पशु पालन व्यवसायाला चालणा दिली जाणार आहे. शेळी- मेंढी पालणातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जातील. त्याच बरोबर जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय जोर धरत आहे. त्यातून सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातील. तसेच ट्रेडींग,रिपेरिंग, हॉटेल, अशा व्यवसायांना अनुकुल वातारण निर्माण केले जाईल. असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
यामुळे माझे विकासाचे व्हिजन क्लिअर असून केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असल्याने आपल्या जिल्ह्याचा कुणीच विकास रोखू शकणार नाही. यामुळे देशाच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मला मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी सभेला आम. मोनिका राजळे, राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.