Sujay Vikhe News: अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. मागील पाच वर्षात केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवा! असा संदेश कार्यकर्त्यांना देवून,विजय महायुतीचा होणार असल्याने विरोधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन त्यांनी केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुन्हा रिंगणात आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदरपासून लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची सोबत मिळाल्याने त्यांच्या या निवडणुकीतील प्रभाव वाढला आहे. महायुतीतील घटक पक्षांना जोडीला घेत डॉ.विखे पाटील यांनी लोकांशी थेट संपर्क सुरु केला असून, त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.विरोधकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करुन केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहीती ते जनतेला सांगत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉ.विखे पाटील यांनी कार्यकर्ते पदा धि कारी यांच्याशी संवाद साधला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता, केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची माहीती लोकांना द्या, त्यात कोणतेही खोटी अथवा वाढवून सांगू नका, आपण केलेली कामे अधिक असून मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून विरोधकांचा कोणताही विचार करू नये. देशाचा निकाल लागला असून लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणुन स्विकारले आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम करायचे आहे. असा संदेश सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांना दिला.
सुजय विखे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून देशाचा झालेला विकास, शेतकरी, गोरगरीब,महिला आणि तरूणांच्या जिवनात विविध योजनांच्या माध्यमातून झालेले बदल यामुळे ३० कोटीहून अधिक लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. गेल्या काही वर्षांत देशात सरकारी योजनांचा मोठा परिणाम झाला आहे. पोषण अभियान आणि अॅनिमिया मुक्त भारत यांसारख्या प्रमुख कार्यक्रमांनी आरोग्यविषयक कमतरता दूर करण्यात योगदान दिले आहे. त्याच वेळी, स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन सारख्या उपक्रमांमुळे देशभरातील स्वच्छता सुधारली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन धन योजना आणि नवीन शिक्षण धोरणामुळे समाजातील प्रत्येक घटकविकासाच्या मुख्य प्रवाहात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील पाच वर्षात लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र आणी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केली. राज्य आणी राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न मार्गी लागले. व्यक्तीगत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली. त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण पुढाकार घेतला. तालुक्यात आता औद्योगीक वसाहती करीता जागेची उपलब्धताही झाल्याने या भागात नवीन उद्योग येवून रोजगार निर्मीतीला संधी असल्याचे डॉ.विखे पाटील म्हणाले.