Dnamarathi.com

Sameer Wankhede :  बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करुन चर्चेत आलेले माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

अलीकडेच ईडीने आयआरएस अधिकारी वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले होते. उच्च न्यायालयाने दिलेला हा तात्पुरता दिलासा अजूनही कायम आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, समीर वानखेडेविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास दिल्लीला वर्ग केला आहे. केंद्रीय एजन्सीने असा युक्तिवाद केला की कार्यवाही आता दिल्लीतून चालविली जात असल्याने, वानखेडे यांनी या प्रकरणात कोणत्याही दिलासासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जावे.

न्यायमूर्ती प्रकाश डी नाईक आणि नितीन आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाविरोधात गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आलेल्या वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. हा तपास ईडीच्या दिल्ली युनिटकडे वर्ग करू नये, अशी मागणी करणारा अंतरिम अर्ज वानखेडे यांनी दाखल केला होता.

त्याचवेळी, प्रशासकीय कारणामुळे तपास मुंबईहून दिल्लीला वर्ग करण्यात आल्याचा युक्तिवाद केंद्रीय संस्थेने न्यायालयात केला. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिल्लीला पाठवण्यात आली असून आता मुंबईत काहीच नाही.

तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने आता गुरुवारी (15 फेब्रुवारी) सीबीआय एफआयआर विरुद्ध वानखेडे यांच्या याचिकेसह या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्याच्या बदल्यात सुपरस्टार शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने वानखेडेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

मात्र, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून 2021 च्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे आपल्याला गोवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *