Vijay Wadettiwar : भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात राखेची किंमत 600-660 रुपये असताना फक्त 353 रुपये टन राख विकण्यात आली असा दावा त्यांनी केला आहे.
विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात राखेच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे प्रकरण वडेट्टीवार यांनी मांडले. भुसावळ येथील राख विक्रीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असताना अर्धी राख मोजमाप न होता विकली गेली. इथे ठरवून भ्रष्टाचार करण्यात आला. यातूनच वाल्मीक कराड सारखे लोक तयार होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.
त्यामुळे या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. राख विक्रीत जो भ्रष्टाचार झाला त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राख विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राख विक्री प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.