विशेष म्हणजे हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे, तर उजाड दिवसा देखील शेतांत, रस्त्यांवर व घरांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. या घटनांचे मोबाईल व्हिडीओ व छायाचित्रे गावकऱ्यांनी चित्रीत केली असून,
Three leopards exposed – अहिल्यानगर : नगर तालुक्यातील वडगाव येथील उघड मळा परिसरात सलग तीन बिबट्यांचे दिवसा दर्शन झाल्यामुळे संपूर्ण गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा हंगामी शेतीचा काळ सुरू असून, दिवसा बिनधास्त वावरणाऱ्या बिबट्यांमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणेच कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उघड मळा परिसरात बिबट्यांचे मुक्त संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे, तर उजाड दिवसा देखील शेतांत, रस्त्यांवर व घरांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. या घटनांचे मोबाईल व्हिडीओ व छायाचित्रे गावकऱ्यांनी चित्रीत केली असून, ती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
video पहा….
वनविभागाचे अजब उत्तर
या प्रकाराबाबत वनविभागाशी वारंवार संपर्क साधूनही काहीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. “मी पिंजरा देतो, तुम्ही बोकड्या आणि ट्रॅक्टर लावून पिंजरा लावा,” असे उत्तर वनअधिकाऱ्यांनी दिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
शेतकरी राम पवार म्हणाले, “शेतीचा मोसम सुरू आहे. शेतीत राबणं गरजेचं असताना जर दिवसाढवळ्या बिबटे फिरत असतील, तर आम्ही शेतात कसं उतरायचं? जीव मुठीत धरून काम करायचं का?” त्यांच्या या उद्गारांमधून शेतकऱ्यांची असहायता आणि संताप स्पष्टपणे दिसून येतो.
गावकऱ्यांनी यापूर्वीही या भागात बिबट्यांचे अस्तित्व असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा पुनरुच्चार यावेळीही झाला आहे.
बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा
ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी. अन्यथा जर बिबट्यांचा हल्ला झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने यास गांभीर्याने न पाहिल्यास, भविष्यात कोणतीही जीवितहानी झाली, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.