DNA मराठी

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik: परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

Pratap Sarnaik: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून आज अखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Pratap Sarnaik: परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक Read More »

img 20260526 wa0007

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार

Pratap Sarnaik :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी “ इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती ” ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज किमान १००० लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. “लहान बचतीतून मोठी आर्थिक नशिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना तातडीने आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. प्रत्येक आगाराने आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आदेशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येईल तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे. “एसटीचा चालक हा केवळ वाहन चालक नसून तो संस्थेच्या अर्थकारणाचा शिल्पकार आहे. जबाबदारीने आणि कौशल्याने वाहन चालवणारा चालक एसटीचे लाखो रुपये वाचवू शकतो,” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. याशिवाय ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत केली असेल, त्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे के.पी.एल. (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी येत असेल, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंधन बचतीसाठी वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल.तसेच बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. टायर प्रेशर, इंजिन ट्युनिंग, ऑईल गळती, ब्रेक प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींमधील त्रुटीमुळेही इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच खर्च नियंत्रण हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. इंधन बचत ही केवळ आर्थिक बाब नसून ती राष्ट्रीय संपत्तीच्या जतनाशी संबंधित जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि चालकाने ही मोहीम स्वतःची समजून राबवावी,” असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik: 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे

Pratap Sarnaik : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, 16 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीस राजेश नार्वेकर, रवी गायकवाड, संदेश चव्हाण, डॉ. ना.कों. भोसले, डॉ. श्यामकांत देवरे, प्रा. सुहासिनी किर्तीकर, डॉ. ज्योती ठाकरे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. डॉ. प्रदीप ढवण, अरुण म्हात्रे, मीनाक्षी जयकर, स्वाती गावडे, शिवाजी गावडे, दीपा ठाणेकर, मोहन पाटील आदी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रशिक्षणासाठी सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. काही शिक्षक मानधनाशिवाय प्रशिक्षण देणार असून, काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. मानधनासाठी मराठी भाषा विभागाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मंत्री सरनाईक यांच्या विनंतीनुसार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर चालकांना प्रमाणपत्र रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली. परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी प्रशिक्षण केंद्रांची अंतिम यादी निश्चित करून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. रिक्षा-टॅक्सी चालकांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यांनी विनामूल्य उपलब्ध असलेले ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चालकांच्या वेळेनुसार प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार असली, तरी 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकली नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार मंत्री सरनाईक यांनी केला. प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली तयारी सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका तयार करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रांतर्गत उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर, रॅपिडो वाहनांवर मराठी संदर्भातील जनजागृती स्टिकर्स लावले जाणार आहेत. मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी विशेष बॅनर्स तयार करण्यात येत आहेत.

Pratap Sarnaik: 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे Read More »

hsrp number plate

HSRP Number Plate : मोठी बातमी! 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य

HSRP Number Plate : राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून घ्यावी.” वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ वेळ (Appointment) निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरनाईक पुढे म्हणाले की, “ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क (Compounding Fees) आकारण्यात येईल.” वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

HSRP Number Plate : मोठी बातमी! 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य Read More »

Dharmveer Anand Dighe : मोठी घोषणा! धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे उभारल्या जाणार 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’

Dharmveer Anand Dighe : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून, बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. “भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे उद्यान या उद्यानामध्ये वृक्षाची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. सबब , वाहतुकीच्या नियमाबरोबरच नागरिकांना पर्यावरणाचे धडे देखील तिथे दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या ई -वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. हे उद्यान त्यामुळे अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Dharmveer Anand Dighe : मोठी घोषणा! धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे उभारल्या जाणार 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ Read More »

img 20260506 wa0003

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार Read More »

Devendra Fadnavis: अमराठी चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा परिवहन विभागाचा पुढाकार

Devendra Fadnavis: राज्यातील प्रवासी सेवा अधिक सुसंवादी व प्रभावी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच Ola आणि Uber सारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या व आवश्यक मराठी वाक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून, प्रवाशांशी सुसंवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि सेवा अधिक सुलभ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. ‘व्यवहारिक मराठी’च्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल आणि सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Devendra Fadnavis: अमराठी चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा परिवहन विभागाचा पुढाकार Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik: अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक

Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे.शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

Pratap Sarnaik: अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक Read More »

Pratap Sarnaik: आनंदाची बातमी! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर

Pratap Sarnaik : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत म्हणजेच एसटीच्या ताफ्यात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या विधिमंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. त्या गौरवशाली परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. नव्या बसेसची ठळक वैशिष्ट्ये : या बसेसमध्ये ३×२ आसन रचना असून एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत पहिल्या ५० बसेस नागपूर येथे दाखल होणार असून, तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Pratap Sarnaik: आनंदाची बातमी! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर Read More »

Pratap Sarnaik: ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरनाईकांचा मोठा निर्णय

Pratap Sarnaik : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की,आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना (ई-रिक्षा) प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा विचार करता केंद्र शासन अधिसूचना क्र. का. आ. २८१२ (अ) दि. ३०/०६/२०१६ अन्वये प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी ई-रिक्षा व ई-बाईक साठीही परमिट (परवाना )प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. तसेच प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे आणि अनियमितता टाळणे हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. दरम्यान, परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून “एक खिडकी योजना ” सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पार पाडली जाणार आहे. तथापि, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी परमिट घेणे अनिवार्य राहणार आहे. नवीन नियमानुसार इलेक्ट्रिक रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट घेणे आवश्यक राहील, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत अधिक शिस्त येईल, नियमांचे पालन सुनिश्चित होईल आणि भविष्यात प्रवाशांना सुरक्षित व नियंत्रित सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Pratap Sarnaik: ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरनाईकांचा मोठा निर्णय Read More »