hpv vaccine

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात

HPV Vaccination : जिल्ह्यात ९ मार्च २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. या मोहिमेत एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येईल. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल. लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चालेल व सर्व पात्र लाभार्थ्यांची तसेच दिलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर केली जाणार आहे. लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशी पोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी. लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाईल. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला तीस मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही. ज्या मुलींना मागील लसीकरणामुळे ॲलर्जी आली असेल किंवा यीस्टची ॲलर्जी असेल त्यांना ही लस दिली जाणार नाही. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना व ज्यांनी यापूर्वी कोणतीही एचपीव्ही लस घेतली असेल त्यांना या मोहिमेत लस मिळणार नाही. या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच गाव पातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नगरगोजे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी केले आहे.

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात Read More »