DNA मराठी

Ahmednagar election

asaduddin owais

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा?

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची 30 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अंजर खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार असून या सभेतून खासदार ओवैसी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह 30 सप्टेंबर रोजी शहरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेतून अहमदनगर शहरासाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा? Read More »

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ahmednagar Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी किंवा व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत तक्रार असल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, मुलजी निवास, डॉ. चोंभे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर (दूरध्वनी क्र. ०२४१-२४५१८५२) येथे करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रे.मु.भिसले यांनी केले आहे.

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर Read More »

Maharashtra Election: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Election: जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अकोले विधानसभा मतदारसंघात ९, संगमनेर १३, शिर्डी ८, कोपरगाव १२, श्रीरामपूर १६, नेवासा १२, शेवगाव १५, राहुरी १३, पारनेर १२, अहमदनगर शहर १४, श्रीगोंदा १६, तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला मतदार आहेत. २०२ तृतीयपंथी मतदार असून सैनिक मतदारांची संख्या ९ हजार ५७५ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे ५४ हजार नवमतदारांची भर पडली असल्याची माहितीही सालीमठ यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९४ ठिकाणी ३ हजार ७६३ मतदान केंद्र आणि दोन सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने शिर्डी मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गजराजनगर (बुऱ्हाणनगर) जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व इमारतीत प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यात १९ हजार ९६० दिव्यांग व ८५ वर्षावरील ५५ हजार ८०१ एवढे मतदार आहेत. यापैकी गृह मतदान सुविधेसाठी २ हजार ६८८ मतदारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान व्यवस्थेचा भाग म्हणून ३४३ क्षेत्रात जिल्ह्याची विभागणी केली असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३ हजार ५८० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच अवैधरित्या वाहतुक करण्यात येणारे मद्य, रोकड आदी मिळून २८ कोटी २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीशी निगडीत ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती ओला यांनी यावेळी दिली.

Maharashtra Election: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त

Maharashtra Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. भरारी पथकाने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे 3 लाख 84 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत. कायनेटीक चौक येथे 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र.  एमएच 19 ईजी 6311 हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त Read More »

Sandeep Kotkar : आरोप खोटे, एन.सी रद्द करा, ‘त्या’ प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Sandeep Kotkar : नगरचे माजी महापौर संदिप कोतकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली खोटी एन.सी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले. माजी महापौर संदिप कोतकर केडगाव येथे येऊन केडगांव देवीचे दर्शन घेतले मात्र त्यांच्या विरोधात संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी खोटी माहिती पसरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात आणि इतर २०० लोकांविरोधात एन.सी. दाखल केली मात्र एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल करण्यात आल्याने ही एन.सी. रद्द करण्यात यावी तसेच खोटी एन.सी. दाखल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाली पोलीस स्टेशन येथे खोट्या घटनेची दि. २४/१०/२०२४ रोजी दाखल केलेली एन.सी. रद्द करुन खोटी एन.सी./तक्रार केल्याने संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आम्ही सर्व नागरीक आपणास निवेदन करु इच्छितो की, आम्ही सर्व नगर येथील राहणारे असून नगरचे माजी महापौर  संदिप कोतकर हे नगर येथे आल्यामुळे त्यांचे केडगांव ग्रामस्थ यांनी स्वागत करुन भेट घेतली तसेच त्यानंतर त्यांनी केडगांव देवीचे दर्शन घेऊन ते त्यांचे केडगांव येथील निवास स्थानी निघून गेले. अशाप्रकारे परिस्थिती असताना संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी दुषीत हेतूने प्रेरीत होऊन कुकारस्थान रचण्याचे उद्देशाने खोटी घटना रचून कोतवाली पोलीस स्टेशन येथे ४२ लोक व इतर २०० लोक अशांविरुद्ध बी.एन.एस. कलम १८९ (२), १९०, २२३, ३(५), ३५१ (२), ३५२ अन्वये तक्रार / एन.सी. नोंदविली आहे. सदरची तक्रार / एन.सी. ही पुर्णतः खोटी असून तशी कोणतीही घटना घडलेली नाही. सदरची एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सदर तक्रार देणारे तक्रारदार यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉर्डोंग तपासून त्यांना संपर्क करणारे संशयीत व्यक्ती व राजकीय दबाव टाकणारे यांचा शोध लागण्यास मदत होईल व साहेबांना सदर प्रकरणाची सत्य परिस्थिती अवगत होईल. एन.सी. दाखल करणारे तक्रारदार हे न्युसेन्सिकल पार्श्वभूमी असलेले व उपद्रवी व्यक्ती असून त्यांना विनाकारण खोट्या केसेस, खटले दाखल करण्याची सवय आहे. अशा उपद्रवी लोकांमुळे परिसरातील आमचे सारख्या नागरीकांना फार त्रास होत आहे व वारंवार आमचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे वरील नोंदविलेल्या खोट्या एन.सी. व तक्रारीची योग्य ती शहानिशा करावी तसेच तक्रारदाराचे मोबाईल कॉल डिटेल्स, रेकॉर्डींग तपासून खोटी एन.सी. दाखल केली म्हणून तक्रारदार व त्याचे बरोबर कटात सामील असलेले संबंधीतांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व सदरची एन.सी. तात्काळ रद्द करण्यात यावी ही साहेबांना नम्र विनंती. सदर तक्रार ही तक्रारदाराने इतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व राजकीय मंडळींना हाताशी धरुन नोंदविल्याचा आम्हाला संशय आहे. असं या निवेदनात म्हटले आहे.

Sandeep Kotkar : आरोप खोटे, एन.सी रद्द करा, ‘त्या’ प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी Read More »

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख ५४ हजार ७४८ महिला व १०७ इतर असे एकूण ३ लाख १४ हजार ५७९ मतदार आहेत.  तसेच मतदार संघामध्ये ५७८ पुरुष, ४२ स्त्री असे एकूण ६२० सैनिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघामध्ये एकूण २९७ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.  ४६ पडदानशील मतदान केंद्रे असून आदर्श मतदान केंद्रांची संख्या ३ एवढी आहे. मतदारसंघात महिला संचलित, युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आणि दिव्यांग संचलित प्रत्येकी एक मतदार केंद्र असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.   निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार असून  २९ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,, गोदाम क्र.६, एम.आय.डी.सी. नागापूर येथे मतमोजणी होणार असल्याची माहितीही  पाटील यांनी यावेळी दिली.    अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा क्र. ०२४१-२३४१९५७  असा आहे. हा कक्ष २४X७  सुरू राहणार असून मतदारांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.  राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील Read More »