Maharashtra Politics: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाला आहे तर 8 जागांवर हा मुद्दा अजूनही अडकला आहे. या 8 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावा करत असल्याने चर्चा सुरु आहे.
वृत्तानुसार, लोकसभेच्या 40 जागांपैकी ज्यांचे वाटप निश्चित झाले आहे, त्यापैकी शिवसेना (उद्धव ठाकरे) 15, काँग्रेस 14 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 9 लोकसभा जागांवर निवडणूक लढवू शकते. तर वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी यांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी यांचाही महाविकास आघाडीत समावेश आहे. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या दोन्ही जागा उद्धव ठाकरे गटाकडून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
2019 मध्ये महाराष्ट्रात MVA ची स्थापना झाली. MVA आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे. तर तिन्ही पक्षही ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. राज्यातील काही छोटे पक्षही विरोधी आघाडीचा भाग आहेत.
महाराष्ट्रातील ज्या आठ लोकसभेच्या जागांवर वाद सुरू आहे त्यात रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा जागांचा समावेश आहे. वास्तविक काँग्रेस मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या जागांची मागणी करत आहे. मात्र 2019 मध्ये शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेना (यूबीटी) या दोन जागा सोडण्यास तयार नाही.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांच्या वाटपाबाबत एमव्हीएची पुढील बैठक 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जागावाटपाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. अकोला लोकसभेची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडली जाऊ शकते. अशा स्थितीत पक्ष या एका जागेवर समाधानी होणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावे लागेल.