Dnamarathi.com

Maharashtra Politics : गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगमी लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत शामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

 सध्या महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र तरीही देखील भाजपला राज ठाकरेंच्या मनसेची गरज का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंची ही प्रतिमा भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी जुळते. चुलतभाऊ उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज यांनी मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर टोलवरून एकनाथ शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

शिवसेना-राष्ट्रवादी असूनही भाजपला मनसेची गरज का? भाजपला एकच आमदार असलेल्या पक्षासोबत युती का करायची आहे? विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असले तरी तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न सुटत नसताना भाजप मनसेला बरोबर घेण्यास उत्सुक आहे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ठाकरे ब्रँड’.

मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना 3-3 जागा मिळाल्या. मात्र यानंतर भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. तीनपैकी दोन खासदारांनी शिवसेनेची (एकनाथ शिंदे) बाजू घेतली. पण पक्षाचे नाव आणि त्याचे चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे आजही मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत आहेत. 

उद्धव यांचा पराभव करण्यासाठी भाजपला ‘ठाकरे ब्रँड’ हवा आहे. राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईशिवाय ठाणे आणि नाशिकमध्येही चांगला पाठिंबा आहे.

‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे शिवसेनेच्या मूळ मतदारांचा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

 मुंबई, ठाण्यासह राज्यातील कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मोठा समर्थन दिसून येत आहे. सहानुभूतीच्या जोरावर ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत विजयी होऊ शकतात आणि याचा फायदा त्यांना आगामी बीएमसी निवडणुका आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा ढाल म्हणून वापर करायचा आहे.

मराठी अस्मिता आणि मराठी माणूस

हिंदुत्वाचा मुद्दा बनवून शिंदे सेना आणि भाजप उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत, तर उद्धव प्रत्युत्तरात भ्रष्टाचार, कुशासन, मराठी अस्मिता, उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरेंनी दिली तर भाजपसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.

 कारण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘नेता’ बनलेल्या राज ठाकरेंना महाराष्ट्राचा धर्म, मराठी अस्मिता यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावीपणे मुकाबला कसा करायचा हे चांगलंच माहीत आहे. राज्यात आपला पाया भक्कम करणाऱ्या मराठी माणसाचा मुद्दा मनसेने सुरुवातीलाच उचलून धरला होता.

विचारधारांची लढाई

काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडून दिल्याचे सांगत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. 

दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून मनसे आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वत:ला सादर करत आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास त्यांना विचारसरणीची अडचण येणार नाही. उलट राजबाबत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मार्ग अवलंबत असल्याचा मेसेज मतदारांमध्ये देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *