DNA मराठी

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

Maharashtra Accident

 Maharashtra Accident :  पिंपरी-चिंचवड शहरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळवडे, पिंपरी चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात किमान सहा जण जखमी झाले आहेत.

केकवर लावल्या जाणार्‍या मेणबत्त्या कारखान्यात बनवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या सात जणांपैकी बहुतांश महिला आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

चिखली व देहूरोड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीत फायर कँडल कंपनी जळून खाक झाली. अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने संपूर्ण कॉम्प्लेक्सला वेढले. अशा परिस्थितीत तिथं काम करणा-या लोकांना पळून जाण्यास वेळ मिळाला नाही. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *