Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका आयटी क्षेत्रातील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे. ‘दैवी शक्ती अंगात येते’ या नावाखाली या भोंदू जोडीने अभियंता आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व मानसिकपणे मोठी फसवणूक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा बळी ठरलेले अभियंता दीपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्याच काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांच्याशी झाली.
या दोघांनी ‘शंकर महाराज आमच्यात अवतरतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात’ असा दावा करत डोळस कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेदिका हिने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा आभास निर्माण केला. त्यानंतर त्यांनी डोळस यांना सांगितले की, पूजा करून आणि धन ‘दैवी शक्ती’साठी वापरल्यास त्यांच्या मुलींचे आजार दूर होतील.
या बहाण्याने दोघांनी डोळस दांपत्याकडील सर्व बँक ठेवी आणि बचत निधी आपल्या खात्यात वळवून घेतला. एवढ्यावर न थांबता, डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात जमा करण्यात आले.
तरीही मुलींच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने डोळस यांनी कारण विचारले असता, खडके-पंढरपुरकर जोडीने त्यांच्या घरात ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी पैसे मागितले. त्यांनी पुण्यातील मालमत्ता विकण्यास सांगितले, आणि जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा घरावर आणि वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले.
2018 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीतून या भोंदू जोडीने एकूण 14 कोटी रुपये डोळस यांच्याकडून घेतले. पोलिस तपासात समोर आले आहे की, या पैशातून दोघांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटी परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
या घटनेनंतर डोळस कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा आर्थिक फसवणुकीने पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.






