HSC Exam: जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे.
या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.
संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील थेट दृश्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वॉररूमच्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४ तालुके व अहिल्यानगर शहरातील १०९ पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे एक हजारपेक्षा अधिक ब्लॉकवर गुगलमीट, ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व केंद्र संचालकांना दूरध्वनीद्वारे तातडीने संपर्क साधला जात आहे. यामुळे कॉपीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात यश लाभत आहे.
जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून आनंददायी परीक्षा पॅटर्नअंतर्गत कॉपी मुक्तीसाठी अत्यंत जागरुकतेने काम करण्यात येत आहे.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य तसेच तांत्रिक सहायक डॉ.अमोल बागूल जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.