Jayant Patil : राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिले होते मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नसल्याची माहिती दिल्यानंतर विरोधक सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे.
तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? संतप्त सवाल केला आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे?
शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते, त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय?
एकाबाजूला श्रीमंत धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब 1-2 लाखांच्या कर्जपायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व. हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.