DNA मराठी

राजकीय

maharashtra local body election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार?

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून अनेक ठिकाणी गटबाजी, नाराजी आणि स्थानिक आघाड्यांची चाचपणी सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये राज्यस्तरावरील चर्चेचा निष्कर्ष अद्याप निघालेला नसल्याने, अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हाऐवजी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार असून २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी आणि २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. यंदा उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदांपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी, ११ पदे अनुसूचित जमातींसाठी, ६७ पदे मागास प्रवर्गासाठी, तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात ६.३४ लाख मतदार, १७ स्थानिक संस्था रणांगणातपुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६,३४,९४० मतदार आहेत. बारामती ही ‘अ’ वर्गातील नगरपरिषद असून, लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि फुरसुंगी-उरळी देवाची या नगरपरिषदा ‘ब’ वर्गात येतात. सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर या ‘क’ वर्गातील नगरपरिषदा आहेत. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींसाठीही आचारसंहिता लागू झाली असून या नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषदेत प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार असून एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी थेट मतदान होणार असल्याने या नगरपरिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ढवळून निघणार आहेत. कोण जिंकणार स्थानिक सत्तेची लढाई, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार? Read More »

shankarrao gadakh

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक

Shankarrao Gadakh : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गडाख आता शिवसेना सोडण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली आहे. तर दुसरीकडे गडाख यांनी यापूर्वी सन 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक Read More »

prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर सातारा जिल्ह्यातील फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात बीडच्या वडवणीतील कवडगाव येथे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची मागणी शासनाकडे केली आणि ती मागणी पूर्ण झाली. दोन दिवसांपूर्वी एसआयटीचे प्रमुख इथे कुटुंबाला भेटून गेले. आलेल्या बातम्यांवरून कळतंय डॉक्टरांना प्रेशराईज केलं जातं होते. वर्षभरात जेवढे पोस्टमार्टम महिला डॉक्टरच्या देखरेखीखाली झाली त्याची चौकशी एसआयटीने करावी. त्या केसमध्ये प्रेशराईज टाकलं जात होतं का नाही हे तपासणं गरजेचं आहे. प्रेशर कोण टाकत होतं? डॉक्टर मंडळी टाकत होती की राजकीय क्षेत्रातील की सामाजिक क्षेत्रातील मंडळी होती? त्यांचे फोन कॉल तपासले पाहिजेत त्यातून या आत्महत्याच खरं कारण कळेल. मुख्यमंत्री जे स्टेटमेंट करतात ते पोलिसांकडून माहिती घेऊनच करतात जे चुकीची माहिती मुख्यमंत्र्याला देतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सूर्यवंशी प्रकरणात देखील पोलिसांनी मुख्यमंत्र्यांला चुकीची माहिती दिली आणि ती सभागृहात त्यांनी मांडली. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्या. जे कोणी आरोपी असतील राजकीय क्षेत्रातले असो किंवा इतर क्षेत्रातील असो त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; केली मोठी मागणी Read More »

parth pawar

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार

Parth Pawar Land Case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चौकशी समितीला प्रस्तुत प्रकरणात नेमकी अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबत सखोल चौकशी करणे, अनियमितता झाल्याचे आढळल्यास, त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर (पूर्वःस्थितीवर) आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे.

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार Read More »

sheetal tejwani

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर…

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकरांचा भूखंड बेकायदेशीररीत्या लाटल्याप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या ‘अमेडिया कंपनी’चे नाव समोर येत आहे. या व्यवहाराबाबत सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेता शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य व्यक्ती ठरलेली शीतल तेजवानी हिच्याबद्दल आता नव्या आणि चक्रावून टाकणाऱ्या बाबी उघडकीस येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, संबंधित 40 एकरांचा भूखंड हा मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. सरकारी ताब्यातील ही जमीन सोडवून तिच्या विक्रीसाठी तेजवानीने युक्ती रचल्याचे तपासात समोर आले आहे. तिने मूळ 272 मालकांना शोधून त्यांच्याकडून नाममात्र 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी (POA) आपल्या नावावर घेतल्याचे समोर आले आहे. या व्यवहाराचा पाया हाच फसवणुकीवर आधारलेला असल्याचे तपास अधिकाऱ्यांच प्राथमिक निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर, 2025 साली तेजवानीने ‘अमेडिया कंपनी’च्या भागीदारीबद्दल माहिती मिळवून पुढील आर्थिक गणित आखले, असे सांगितले जाते. या कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के, तर दिग्विजय पाटील यांचा 1 टक्का हिस्सा आहे. हे गिऱ्हाईक लाभदायक ठरेल, हे लक्षात घेऊन तेजवानीने पुढील व्यवहार रचल्याची चर्चा आहे. मात्र, शीतल तेजवानीचा भूतकाळही संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी असून, त्याची चौकशीदेखील झाल्याची नोंद आहे. या दाम्पत्यावर तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दस्तऐवजनुसार, सागर सूर्यवंशीने ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर दोन वाहन कर्जे आहेत एक 1.16 कोटी आणि दुसरे 2.24 कोटी रुपये घेतली आहेत. शीतल तेजवानीनेही दोन वाहनांसाठी 4.80 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे नोंदीत आढळते. त्याशिवाय सागर सूर्यवंशीने ‘सागर लॉन्स’च्या नावावर 16.48 कोटींचे कॅश क्रेडिट कर्ज, तर शीतल तेजवानीवर स्वतंत्र 10 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तिच्या ‘पॅरामाउंट इन्फ्रा’ या कंपनीवर 5.95 कोटी, तर ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर आणखी 5.25 कोटींचे कर्ज असल्याने, या दाम्पत्याची एकत्रित थकबाकी कोट्यवधी रुपयांत गेल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शीतल तेजवानी सध्या कुठे आहे, तिचे कार्यालय कुठे आहे तसेच,ती कुठे कामकाज पाहते, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्त्वाचे दुवा असल्याने, तिच्या चौकशीमधून अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील संबंधांवर नव्या माहितीचा पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे या प्रकरणात काय ट्वीस्ट येतो आणि काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास याप्रकरणी पार्थ पवारांच नाव समोर आल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे मात्र, प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर… Read More »

dhananjay munde on manoj jarang

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Dhananjay Munde on Manoj Jarang : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा.. नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधीही जात पाहून राजकारण केलेले नाही. गेले 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. परळीत आंदोलन झालं, त्याला जागा देण्यासाठी मी जरांगेंना मदत केली. मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, असे मनोज जरांगेंना वाटते. मी 17 तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही. मराठा समाजाला खरंच ओबीसी की EWS मध्ये जाऊन फायदा आहे का? यावर उत्तर द्या असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा. आमची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरणाची चौकशी सरकारनं नाही तर, सीबीआयने करावी अशी देखील मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले

Sunil Tatkare: तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या निवडणुकीला सज्ज झाला असून आता राज्य व जिल्हास्तरावर महायुती म्हणून सामोरे जात असताना कशाकशापध्दतीने सामोरे जायचे हे ठरवायचे आहे.यासंदर्भात पुढील तीन दिवसात चर्चा होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. पालघर, ठाणे शहर, ग्रामीण मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी या जिल्हयांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्या- त्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री, आमदार, माजी खासदार उपस्थित होते. सोमवारपासून सुरू झालेल्या या बैठकांना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते ती माहिती सर्वांनी सादर केली. आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची आणि माझी चर्चा झाली. त्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रीमंडळाची बैठक झाल्यावर समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आम्ही ज्या भावना जिल्ह्याने मांडल्या त्या मला ज्ञात आहेत. शिवाय भाजप – शिवसेनाच्याही बैठका झाल्या. त्यांच्या नेत्यांना त्या ज्ञात आहेत.त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत आम्ही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या त्या महायुती म्हणून ठरवणार आहोत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जी काही राजकीय समीकरणे आहेत ती समजून घेत आहोत. त्यामुळे जाहीर झालेल्या निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निवडणूकीच्या मोडवर गेले आहेत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने जाहीरपणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती नको असे त्यांच्या तिन्ही आमदारांनी आणि जिल्हाप्रमुखांनी मत व्यक्त केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही जाहीरपणे याबद्दल मत व्यक्त केलेले नाही आणि कधी केलेही नव्हते. अजितदादांसमोर रायगड जिल्हाध्यक्षांनी याबद्दल सर्व माहिती दिली ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही रायगडमध्ये बायकॉट करण्याचा संबंधच नाही. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची भूमिका रायगड जिल्हयात मांडलेली आहे. त्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहे त्यामूळे योग्यवेळी योग्य निर्णय होईल असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. भाजप आणि शिवसेनेसोबत वेगवेगळ्या पातळीवर संवाद सुरू आहेच. रायगड पुरते बोलायचे झाले तर रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणार नाही अशी उघड भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले Read More »

Maharashtra Election: पुण्यात भाजपचा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’; ‘या’ आमदारांवर मोठी जबाबदारी

Maharashtra Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘‘शतप्रतिशत भाजपा’’ असा निर्धार करण्यात आला असून, भाजपा पक्षश्रेष्ठींनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांनी नियुक्ती करीत ‘एक पाऊल पुढे’ टाकले आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याच्या तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची घोषणा केली. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री पवार यांचे ग्रामीण भागात चांगले वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हक्काचे दोन हुकमी एक्के बाहेर काढले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ अशी जबाबदारी देण्यात आली आहे. तर दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांना जबाबदारी सोपवली आहे. लांडगे आणि कूल दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक पातळीवर आव्हान देणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी आमदार महेश लांडगे यांनी ‘‘पुणे जिल्ह्याचे विभाजन करा आणि उत्तर पुणे जिल्ह्याला ‘‘शिवनेरी’’ असे नाव द्या’’ अशी जाहीर मागणी केली होती. यावरुन अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा राजकीय संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही लांडगे यांनी पवार यांच्याविरोधात दंड थोपाटले होते. 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता खेचून आणली आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला काबिज केला होता. दुसरीकडे, आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांनी 2019 मध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी, 2009 मध्ये राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला मदत केली, त्यावरुन नाराज झालेल्या राहुल कुल यांनी सुरूवातीला रासप आणि 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. पवार कुटुंबियांना थेट आव्हान देणारा नेता म्हणून कुल यांची ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल यांना मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुणे उत्तर आणि दक्षिण दिग्विजय करण्यासाठी भाजपाने ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याचे निश्चित केले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. पुणे जिल्ह्यात देवाभाऊंची ‘‘कमांड’’ विशेष म्हणजे, पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे असे मातब्बर असताना नवख्या गणेश बिडकर यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये माजी खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे असे नेते आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी न देता आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तसेच, पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे धुरा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी पहिल्याच टप्प्यात पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर ‘‘कमांड’’ मिळवली आहे, असे चित्र आहे. पुण्यात बिडकर, पिंपरी-चिंचवडमध्ये जगताप… पुणे महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांची नियुक्ती झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना जबाबदारी दिली आहे. बिडकर आणि जगताप हेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाबाहेर नाहीत. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरुन काही प्रमाणात कुरबुरी होत्या. पुण्यात घाटेंना आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काटेंना शहराध्यक्षपदी संधी दिल्यामुळे बिडकर आणि जगताप यांच्यात नाराजी होती, असे बोलले जाते. या ‘गृहकलहाचा’ परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होवू नये. या करिता शहराध्यक्षांना निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी न देता पुण्यातून बिडकर आणि पिंपरी-चिंचवडमधून जगताप यांच्याकडे धुरा दिली आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर झाल्यास, जगताप आणि बिडकर यांना भाजपाच्या ‘‘परफॉर्मन्स’’ची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. किंबहुना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत दोन हात करण्यासाठी स्थानिक पातळीवर रणनिती आखावी लागणार आहे.

Maharashtra Election: पुण्यात भाजपचा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’; ‘या’ आमदारांवर मोठी जबाबदारी Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतांची चोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकामध्ये मत चोरीचा आरोप केला होता. तर आता त्यांनी हरियाणामध्ये तब्बल 25 लाख मतांची चोरी झाली असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत या तरुणीने 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप Read More »

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Maharashtra Election : जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत. जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे. संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील. जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, पाथर्डी नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील. राहाता नगरपरिषदेकरिता मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील. राहुरी नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार,राहुरी) नेमले गेले आहेत. देवळाली प्रवरा नगरपरिषदेकरिता श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील. नेवासा नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील. शिर्डी नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतिश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेकरिता श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील. सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त Read More »